Wednesday, 05 May, 3.40 am My महानगर

क्रीडा
IPL 2021 : आयपीएलचा टाईम आऊट! कोरोनाच्या उद्रेकानंतर मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित

कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यानंतर अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आयपीएल स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले. या स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची असून त्यांच्या जीवाशी आम्ही खेळू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा स्थगित करणे हाच योग्य निर्णय असल्याचे आम्हाला वाटले, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले. यंदा आयपीएलचे ६० पैकी २९ सामनेच होऊ शकले.

तातडीने बैठक झाली

सोमवारी वरूण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती. तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या तीन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ मंगळवारी सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या प्रत्येकी एक-एक खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याने बीसीसीआयला आयपीएल स्पर्धेबाबत काही तरी निर्णय घेणे भाग पडले. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची तातडीने बैठक झाली. या बैठकीत आयपीएल स्पर्धेचा उर्वरित मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला.

फ्रेंचायझीने केली मागणी

सोमवारी पाठोपाठ मंगळवारी कोरोनाने दोन संघांच्या बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यानंतर एका फ्रेंचायझीने बीसीसीआयकडे धाव घेतली. आता परिस्थिती गंभीर होत असून ही स्पर्धा तीन-चार महिन्यांनी पुन्हा आयोजित केली तरीही चालू शकेल. मात्र, आता स्पर्धा स्थगित झालीच पाहिजे, अशी मागणी या फ्रेंचायझीकडून करण्यात आली होती.

बीसीसीआयचा हट्ट पडला महागात

यंदा आयपीएल स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली. मात्र, त्याच्या एक आठवडा आधी गव्हर्निंग कौन्सिलने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आयपीएल युएईमध्ये घेण्याचा प्रस्ताव बीसीसीआयपुढे ठेवला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात परिस्थिती चिंताजनक होऊ शकेल अशी भीती आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केली होती. तसेच अमिराती क्रिकेट बोर्डसुद्धा आयपीएलच्या आयोजनासाठी तयार होते. मात्र, इतक्या कमी कालावधीत संपूर्ण स्पर्धा युएईत हलवणे शक्य नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

मोठा आर्थिक फटका बसणार

कोरोनाचा हा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने यंदाचा आयपीएल मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित केला. मात्र, या निर्णयाचा बीसीसीआय, संघ, प्रसारक आणि जाहिरातदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आयपीएल न झाल्यास आमचे तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मागील वर्षी म्हणाला होता. यंदा आयपीएलचे ६० पैकी केवळ २९ सामनेच होऊ शकेल. त्यामुळे बीसीसीआयचे ४०० कोटींचे नसले, तरी मोठे आर्थिक नुकसान होणार हे निश्चित आहे. तसेच प्रसारकांना २ हजार कोटीहूनही अधिकचा फटका बसू शकेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top