Friday, 07 May, 6.40 pm My महानगर

क्रीडा
IPL 2021 : भारतात खेळताना दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना कसलाही धोका जाणवला नाही; बोर्डाने केले स्पष्ट

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य व ग्राऊंड स्टाफपैकी काहींना कोरोनाची बाधा झाल्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला ही स्पर्धा स्थगित करणे भाग पडले. त्यामुळे आयपीएल स्पर्धेतील बायो-बबलवर आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष ग्रॅमी स्मिथने बीसीसीआयची पाठराखण केली आहे. बायो-बबल वातावरण पूर्णपणे कधीही सुरक्षित नसते. परंतु, बीसीसीआयने खूप मेहनत घेत स्पर्धेच्या आयोजनाचा चांगला प्रयत्न केल्याचे स्मिथ म्हणाला. यंदा आयपीएलमध्ये ११ दक्षिण आफ्रिकन सहभागी झाले होते.

खेळाडूंना भारतात सुरक्षित वाटले

मला उगाचच टीका करायला आवडत नाही. मी आमच्या खेळाडूंशी त्यांच्या आयपीएल स्पर्धेतील अनुभवाबाबत संवाद साधला आहे. त्यांच्या मते, भारतात चांगले बायो-बबल तयार करण्यात आले होते. त्यांना कसलाही धोका जाणवला नाही. परंतु, कोरोनाची परिस्थितीच अशी आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही खबरदारी घेतली, तरी बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो. परंतु, आमच्या खेळाडूंना भारतात सुरक्षित वाटत होते, असे स्मिथने स्पष्ट केले.

स्मिथने मानले बीसीसीआयचे आभार

तसेच दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना सुखरूप मायदेशी पाठवण्यासाठी बीसीसीआयने घेतलेल्या मेहनतीबद्दल स्मिथने त्यांचे आभार मानले. आयपीएलमध्ये सहभागी झालेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू शुक्रवारी मायदेशी परतले असून त्यांना १० दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेत हवाई वाहतूक स्थगित न केल्याचाही फायदा झाल्याचे स्मिथ म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top