Wednesday, 15 Sep, 7.40 pm My महानगर

क्रीडा
IPL 2021 : चेन्नईला दुहेरी धक्का, मुंबईविरुद्धच्या सामन्याला डुप्लेसिस, सॅम करन मुकणार

आयपीएलच्या १४ व्या हंगामाचं (IPL 2021) दुसरं सत्र १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरु होणार आहे. दुसऱ्या सत्राची सुरुवात ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्याने होणार आहे. मात्र, सामना व्हायच्या आधीच चेन्नई संघाला दुहेरी धक्का बसला आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर फाफ डुप्लेसीस आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करन पहिल्या सामन्याला मुकणार आहेत.

फाफ डुप्लेसीसला दुखपत झाल्याने तो पहिल्या सामन्याला मुकणार आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत फाफला दुखापत झाली आहे. यामुळे तो मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या लढतीत खेळण्याची शक्यता कमीच आहे. मंगळवारी झालेल्या CPLच्या सेमीफायनल सामन्यात फाफ खेळला नव्हता. त्याची दुखापत गंभीर असल्याचे दिसते. त्यामुळेच तो सलग दोन सामने खेळला नाही. दरम्यान, डुप्लेसीसला जोपर्यंत आमची वैद्यकीय टीम आणि फिजिओ तपासत नाहीत, तोपर्यंत आम्ही तो सामना खेळेल की नाही याबद्दल बोलू शकत नाही, असं सीएसकेच्या सुत्रांनी सांगितलं.

तर दुसरीकडे सॅम करन हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका खेळत होता. तो अद्याप यूएईमध्ये दाखल झालेला नाही. सॅमला क्वारंटाइनच्या नियमांमुळे मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या लढतीत खेळता येणार नाही.

आयपीएलच्या पहिल्या सत्रात या दोन खेळाडुंनी चांगली कामगिरी केली आहे. फाफने ७ सामन्यात ६४ च्या सरासरीने ३२० धावा केल्या होत्या. त्यात चार अर्धशतकांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १४५.४५ इतका होता. तर सॅम करनने ७ सामन्यात ५२ धावा आणि ९ विकेट घेतल्या होत्या. आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्या सत्रात चेन्नईने चांगली कामगिरी केली आहे. चेन्नई ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळून १० गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top