Thursday, 08 Apr, 3.40 pm My महानगर

क्रीडा
IPL 2021 : रोहित-विराट आमनेसामने! MI vs RCB सलामीची लढत

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून सलामीच्या लढतीत रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमनेसामने येणार आहेत. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र, असे असले तरी या दोन संघांमधील सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली. मात्र, याचा रोहितच्या मुंबई इंडियन्स संघावर परिणाम झाला नाही. मुंबईने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यामुळे यंदाही मुंबईलाच जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.

जेतेपदाची हॅटट्रिक करण्यासाठी उत्सुक

मुंबईच्या संघात रोहितसह सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या उत्कृष्ट भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या संघात क्विंटन डी कॉक (पहिल्या सामन्याला मुकणार), किरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या स्टार परदेशी खेळाडू असल्याने मुंबईचा संघ यंदा जेतेपदाची हॅटट्रिक करण्यासाठी उत्सुक आहे.

जेतेपदाचा दुष्काळ संपवणार

दुसरीकडे यंदाही कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून जेतेपदाची चाहत्यांना अपेक्षा आहे. बंगळुरूला अजून आयपीएल स्पर्धा जिंकता आली नसून यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. बंगळुरूचा संघ नेहमीच कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावर अवलंबून असतो. मात्र, या दोघांवरील ताण कमी करण्यासाठी यंदा बंगळुरूने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायेल जेमिसनला मोठ्या किंमतीत खरेदी केले. त्यामुळे हे दोघे कशी कामगिरी करतात याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top