Thursday, 29 Oct, 10.02 pm My महानगर

क्रीडा
IPL : पुढील मोसमात धोनी CSKचा कर्णधार राहण्याबद्दल गंभीरचे मोठे वक्तव्य

महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. यंदाच्या मोसमात मात्र धोनीला आणि त्याच्या चेन्नई संघाला चांगला खेळ करता आलेला नाही. चेन्नईला १२ पैकी केवळ चार सामने जिंकता आले असून हा संघ ८ गुणांसह गुणतक्त्यात तळाला म्हणजेच आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे हा संघ प्ले-ऑफ गाठणार नाही हे निश्चित आहे. चेन्नईची प्ले-ऑफमध्ये प्रवेश न करण्याची ही आयपीएल इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पुढील मोसमात चेन्नईच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, चेन्नईचा संघ धोनीला पुढील मोसमातही कर्णधार म्हणून कायम ठेवू शकेल, असे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला वाटते.

चेन्नईच्या संघात बदल अपेक्षित

चेन्नईचा संघ इतका यशस्वी झाला आहे, कारण त्यांचा कर्णधार आणि संघमालक यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. त्यांनी धोनीला कर्णधार म्हणून हवे ते निर्णय घेण्याची मोकळीक दिली आहे. तसेच संघमालक धोनीचा खूप आदरही करतात. त्यामुळे पुढील मोसमातही धोनीच चेन्नईचा कर्णधार म्हणून कायम राहिल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. तसेच धोनी हवी तितकी वर्षे या संघातून खेळत राहील असेही मला वाटते. मात्र, धोनी कर्णधारपदी कायम राहिला, तरी चेन्नईच्या संघात बरेच बदल होणे अपेक्षित आहे. धोनीच्या भूमिकेत मात्र फारसा बदल होणार नाही असे मला वाटते. चेन्नईच्या संघमालकांनी त्याला तितका आदर दिलाच पाहिजे, असे गंभीर म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top