Dailyhunt
Jay Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जय पवार म्हणाले, आम्ही कुटंब म्हणून.

Jay Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जय पवार म्हणाले, आम्ही कुटंब म्हणून.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. यावेळी, त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकीकडे त्यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्यासोबत सुरु होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांनी केला.

पण, त्यांचा हा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी नाकारला. यावरून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का? अशा चर्चा अजूनही रंगल्या होत्या. मात्र, कालांतराने या चर्चा थांबल्या असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चेला हवा मिळाली आहे. अशामध्ये दिवंगत अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी शनिवारी (4 एप्रिल) महत्त्वाचे विधान केले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना भूमिका विचारली असता ते म्हणाले की, "पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि इतर बाकीचे ज्येष्ठ नेतेमंडळी ठरवतील, त्याबाबत बोलण्यासाठी मी खूप लहान आहे. पण मला वाटत की आम्ही कुटुंब म्हणून सर्वजण एकत्र राहावे. कारण, अजितदादा आम्हाला सोडून गेले ते पवार कुटुंब एकत्रित होते. आजही आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत," असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. "राजकारणाविषयी बोलणे मला योग्य वाटत नाही, त्याबाबत आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील," असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना जय पवार यांनी बारामती पोटनिवडणूकीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. शरद पवारांनीही आजच अशी भूमिका व्यक्त केली आहे. अजितदादांचे काम व प्रेम सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे बारामतीकरांचीही तीच इच्छा आहे. काँग्रेसने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी अजून आपला उमेदवार दिला नाही. या प्रकरणी खूप घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील." असे ते म्हणाले. "गरज पडली तर आम्हीही त्यांच्याशी संवाद साधू. पण बारामतीकरांचे पवार कुटुंबीयांवर खूप प्रेम आहे. जनता अजूनही खूप भावनिक आहे. त्यामुळे विरोधकांना लढायचे असेल तर लढावे, पण बारामतीकर या निवडणुकीत काय करणार? हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही अजित पवारांशिवाय निवडणूक लढवण्याची कल्पनाही केली नव्हती." असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar