लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी 1974 साली इंदिरा गांधी यांच्या सरकारविरुद्ध उभी केलेली विद्यार्थी चळवळ आणि अभिजीत दीपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्ध उभी केलेली तरुणांची चळवळ या दोन्ही घटना भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील दोन महत्त्वाचे टप्पे आहेत.
वरवर पाहता दोन्हींमध्ये पन्नास वर्षांचे अंतर आहे, तंत्रज्ञान बदलले आहे, नेते बदलले आहेत, पण या दोन्ही चळवळींचा आत्मा एकच आहे. तो म्हणजे सत्तेला प्रश्न विचारण्याचा तरुणांचा हक्क आणि व्यवस्थेविरुद्धचा असंतोष, याच विचारांनी युरोपमध्येही तरुणांनी महत्त्वाच्या क्रांत्या केल्या होत्या.
पाटना येथे 18 मार्च 1974 रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी त्याला 'संपूर्ण क्रांती' असे नाव दिले. या क्रांतीचा उद्देश फक्त सरकार बदलणे हा नव्हता, तर व्यवस्था बदलणे हा होता. राजकारण, समाज, शिक्षण, अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांमध्ये नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना व्हावी अशी त्यांची भूमिका होती. जेपी स्वत: सत्तेच्या राजकारणापासून अलिप्त होते. सर्वोदय चळवळीतून आलेले, गांधीवादी विचारांचे ते एक नैतिक नेतृत्व होते. त्यामुळे त्यांच्या शब्दाला वजन होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, एक वर्षासाठी कॉलेज सोडा आणि गावोगावी जाऊन जनजागृती करा. हजारो तरुणांनी वर्ग सोडले आणि रस्त्यावर उतरले. या चळवळीचा परमोच्च बिंदू म्हणजे 25 जून 1975 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावरील सभा. त्याच रात्री देशात आणीबाणी लागू झाली. जेपींसह हजारो नेते तुरुंगात गेले. पण तुरुंगातूनच पुढच्या परिवर्तनाची बीजे रोवली गेली. 1977 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि जनता पक्षाच्या रूपाने इंदिरा गांधींचा पराभव झाला. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेसी सरकार केंद्रात आले.
याउलट अभिजीत दीपके यांची चळवळ 21व्या शतकातील आहे. ती मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात जन्माला आली. दीपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे मुख्य मुद्दे बेरोजगारी, सरकारी नोकरभरतीतील घोटाळे, शिक्षणाचे खासगीकरण, डेटा गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणारी बंधने हे होते. जेपींची चळवळ रस्त्यावरून, सभांमधून आणि तुरुंगवासातून घडली, तर दीपके यांची चळवळ ट्विटर ट्रेंड, यूट्यूब लाईव्ह, इन्स्टाग्राम रील्स आणि टेलिग्राम ग्रुपमधून घडली. त्यांनी 'डिजिटल सत्याग्रह' ही संकल्पना मांडली. हजारो तरुणांनी आपापल्या घरातून, हॉस्टेलमधून सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली. रस्त्यावरच्या मोर्चांऐवजी हॅशटॅग मोहिमा झाल्या. जेपींना नैतिकतेचे, त्यागाचे भांडवल होते, तर दीपके यांच्याकडे डेटाचे, माहितीचे भांडवल आहे. जेपींनी 'सत्ता ही सेवेसाठी आहे' हा मंत्र दिला, तर दीपके 'सरकारला जाब विचारा, तो तुमचा हक्क आहे' हा मंत्र देतात. दोन्ही चळवळींमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण.
जेपी म्हणत होते की, इंदिरा गांधी सर्व सत्ता आपल्या हातात एकवटत आहेत, संस्था कमकुवत करत आहेत. दीपके यांचा आरोप आहे की सध्याचे सरकारदेखील माध्यमे, तपास यंत्रणा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियंत्रण मिळवू पाहत आहे. फरक फक्त साधनांचा आहे. 1974 मध्ये वर्तमानपत्रांचे गळे दाबले गेले, तर आज आरोप आहे की सोशल मीडिया अल्गोरिदमवर दबाव आणला जातो. जेपींच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समाजवादी, काँग्रेसमधील असंतुष्ट अशा अनेक विचारधारांचा पाठिंबा होता. त्यामुळे तिचे स्वरूप व्यापक झाले. दीपके यांची चळवळ तुलनेने अधिक विकेंद्रित आहे. तिला कोणत्याही एका मोठ्या राजकीय पक्षाचा उघड पाठिंबा नाही. ती 'लीडरलेस' स्वरूपाची असल्याचा दावा केला जातो. यात ताकदही आहे आणि मर्यादाही. ताकद अशी की कोणताही एक नेता अटक झाला तरी चळवळ थांबत नाही. मर्यादा अशी की स्पष्ट नेतृत्वाअभावी दीर्घकालीन राजकीय पर्याय उभा राहत नाही. जेपींच्या चळवळीचे फलित म्हणजे जनता पक्षाचे सरकार. दीपके यांच्या चळवळीचे फलित अद्याप निवडणुकीच्या राजकारणात दिसलेले नाही. पण त्यांनी तरुणांमध्ये प्रश्न विचारण्याची संस्कृती नक्कीच रुजवली आहे.
दोन्ही चळवळींची तुलना करताना काळाचे भान ठेवणे गरजेचे आहे. 1974 सालचा भारत आणि 202६ सालचा भारत यात फरक आहे. तेव्हा माहितीचा दुष्काळ होता, आज माहितीचा महापूर आहे. तेव्हा बेरोजगारी होती, आज 'स्किल गॅप'ची समस्या आहे. तेव्हा आणीबाणी होती, आज डिजिटल पाळत ठेवण्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही चळवळींच्या यशाचे मोजमाप एकाच पट्टीने करता येणार नाही. जेपींची चळवळ व्यवस्थेला धक्का देऊन गेली आणि तिने भारतीय राजकारणाचा पोत बदलला. दीपके यांची चळवळ व्यवस्थेला आरसा दाखवत आहे आणि तरुणांच्या मनात असलेली घुसमट व्यक्त करत आहे. एक चळवळ इतिहास झाली आहे, दुसरी चळवळ वर्तमानात घडत आहे. भविष्यात ती इतिहास घडवेल का, हे काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित. जोपर्यंत देशात तरुण आहेत, तोपर्यंत सत्तेला प्रश्न विचारणारे आवाजही जिवंत राहतील. कारण लोकशाही ही केवळ निवडणुका नसते, तर ती रोज प्रश्न विचारण्याची प्रक्रियाही असते. जेपींनी तो धडा शिकवला आणि आजची पिढी तोच धडा नव्या माध्यमातून गिरवत आहे.
जगाच्या इतिहासाकडे पाहिलं तर तरुणांनी व्यवस्थेला आव्हान देऊन घडवलेल्या अनेक क्रांत्या दिसतात. यात 1989 ची पूर्व युरोपमधील 'वेल्वेट रिव्होल्युशन' अर्थात मखमली क्रांती विसरता येणार नाही. याच काळात 'कम्युनिस्ट राजवटींची पडझड' अव्वल स्थानावर येते. यातही विशेषत: चेकोस्लोव्हाकियामध्ये झालेल्या क्रांतीला वेल्वेट अर्थात शांततापूर्ण किंवा हळूवार क्रांती म्हटले जाते. कारण तिथे रक्ताचा एकही थेंब न सांडता तरुणांनी एका बलाढ्य हुकूमशाही राजवटीला गुडघे टेकवायला लावले होते. या लढ्याचे नेतृत्व कोणत्याही सैनिकाने किंवा हिंसक नेत्याने केले नाही, तर ते विद्यार्थी, लेखक, कवी आणि नाटककारांनी केले होते. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सूडाचे राजकारण न करता लोकशाही मजबूत करण्यावर भर दिला. विरोधकांच्या विरोधी विचारांचाही आदर व्हायला हवा, हे लोकशाहीचे मूलतत्व तिथे या क्रांतीतून रुजले. त्यातूनच पुढेे जाऊन 1993 मध्ये जेव्हा चेक आणि स्लोव्हाक या दोन गटांना एकत्र राहणे कठीण वाटू लागले, तेव्हा त्यांनी युद्धाऐवजी अत्यंत सामोपचाराने शांततेत देशाचे दोन तुकडे केले. चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हेदेखील याच वेल्वेट क्रांतीचे फलित होते.
17 नोव्हेंबर 1989 रोजी प्रागमधील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला, पण तरुण मागे हटले नाहीत. काही दिवसांतच देशातील लाखो तरुण आणि नागरिक रस्त्यावर उतरले. शांततेच्या मार्गाने जनशक्ती आणि संपाच्या जोरावर तरुणांनी सरकारला झुकवले. अवघ्या काही आठवड्यांतच तिथे 41 वर्षांची कम्युनिस्ट हुकूमशाही संपली. देशात लोकशाही आली आणि प्रसिद्ध लेखक व मानवाधिकार कार्यकर्ते वाक्लाव हावेल हे राष्ट्राध्यक्ष बनले. आपल्याकडे कॉक्रोच जनता पार्टीनेही शांततेचा मार्ग अवलंबला असल्याने आणि कॉक्रोचना सोनम वांगचूक यांचा पाठिंबा मिळाल्याने दोन्ही आंदोलनातील हे कमालीचे साम्य आहे. समाजमाध्यमांवर कॉक्रोचना मिळालेले समर्थन रस्त्यावरच्या आंदोलनातही कायम ठेवण्यात तरुणांना यश मिळते का? की सरकारच्या आयटी सेल, माहिती क्षेत्रात काम करणार्या यंत्रणा या 'झुरळांना' नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवतात, हे येत्या काळात समजेल.
समाजमाध्यमांवर क्रांतीचा एका क्लिकवर 'एल्गार' करणे सोपे असते, मात्र रस्त्यावर थेट व्यवस्थेच्या विरोधात लढताना संयम, सचोटी, शांतता, सहनशीलता, सातत्य आणि सत्यनिष्ठा आवश्यक असते, त्यासाठी समविचारांचे वैचारिक ऐक्य महत्त्वाचे असते. अभिजीत दीपकेंवर तरुणांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी वैचारिक भेसळ आणि ध्येयविचलनापासून कॉक्रोचना सावध राहावे लागणार आहे, त्यासाठी इतिहासातील तरुणांच्या क्रांती मार्गदर्शक ठरू शकतील. जगाच्या इतिहासात तरुणांच्या दोन यशस्वी क्रांती सांगता येतील. यातील भारताचा स्वातंत्र्यलढा (1920-1947) महत्त्वाचा आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनांना खरी ताकद महाविद्यालयाच्या तरुणांनी दिली. 'भारत छोडो' आंदोलन असो वा सविनय कायदेभंग, लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून देशासाठी स्वत:ला झोकून दिले. दुसरीकडे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांसारख्या विशीतल्या तरुणांनी आपल्या बलिदानाने संपूर्ण देशात राष्ट्रवादाची अभूतपूर्व लाट निर्माण केली, जिच्यासमोर शेवटी ब्रिटिश साम्राज्याला माघार घ्यावी लागली. ट्युनिशिया, इजिप्त यांसारख्या देशांमध्ये अनेक दशकांपासून असलेल्या हुकूमशाही राजवटींविरोधात तिथल्या फेसबुक आणि ट्विटर वापरणार्या तरुण पिढीने एकत्र येऊन लढा पुकारला. सोशल मीडियाचा वापर करून तरुणांनी लाखोंची गर्दी जमवली आणि हुकूमशहांची सत्ता उलथवून लावली. जरी नंतरच्या काळात काही देशांमध्ये राजकीय अस्थिरता आली, तरी तरुणांनी हुकूमशाहीविरुद्ध दाखवलेले ते धाडस ऐतिहासिक असल्याने त्याची दखल जगाला घ्यावी लागली, कॉक्रोच जनता पार्टीवर लोकांनी विश्वास टाकला आहे. कॉक्रोचनी लोकशाही मूल्यांचा केलेला उद्घोष नेटाने कायम ठेवल्यास हा विश्वास अधिक मजबूत होईल.

