नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. 2013 ते 2018 आणि 2023 पासून कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे सिध्दरामय्या यांनी गुरुवारी (28 मे) राजीनामा दिला.
तसेच, यावेळी नवे मुख्यमंत्री म्हणून सध्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नाव जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे याचदिवशी सकाळी बोलावण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी नाश्ता करता करताच आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री असतील, असा प्रस्ताव त्यांनी सर्वांसमोर ठेवला. यानंतर बैठकीमध्ये शिवकुमार हे सिध्दरामय्या यांच्या पाया पडल्याचे फोटो व्हायरल झाले.
काँग्रेसने डी के शिवकुमार यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याची तयारी सुरु केली होती. अशामध्ये गेल्या दोन दिवसांत अनेक घडामोडी घडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेले सिध्दरामय्या यांच्यासोबत काँग्रेस नेतृत्वाची मॅरेथॉन बैठक झाली होती. दिल्लीहून परतल्यानंतर सिध्दरामय्या यांनी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी मंत्र्यांसोबत नाश्त्याची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमारही बैठकीला उपस्थित होते. शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांच्या पायांना स्पर्श केला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मिठी मारली. त्यांचे हे बैठकीतील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
बैठकीत केलेल्या घोषणेनंतर सिध्दरामय्या यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता. मात्र, ते कौटुंबिक कारणांमुळे बंगळुरूबाहेर असल्याने त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांच्या सचिवांकडे सोपवला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी डी.के शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पण, राजकीय अनुभव पाहता सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हाच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूला ठरलेला होता. आधीच्या अडीच वर्षात सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री असतील आणि नंतरच्या अडीच वर्षात डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री असतील, असे ठरवण्यात आले होते.
अशी आहे सिद्धरामय्या यांची राजकीय कारकीर्द?
सिद्धरामय्या यांनी याआधी 2013 ते 2018 या काळात पहिल्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर 20 मे 2023 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जानेवारी 2026 मध्ये ते कर्नाटकच्या इतिहासामध्ये देवराज अर्स यांचा विक्रम मोडून सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहणारे नेते ठरले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी 1996-1999 आणि 2004-2005 कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही भूषवले आहे.
काँग्रेसकडून सिद्धरामय्या यांना मोठी ऑफर
समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या राजीनामा देण्यास सहजासहजी तयार झाले नाही. त्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस पक्षाने त्यांना मोठी ऑफर दिली. त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांना कर्नाटक मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्रिपद दिले जाणार आहे. या ऑफरनंतर सिद्धरामय्या राजीनामा देण्यास तयार झाल्याचे बोलले जाते.

