श्रीनिवास नार्वेकर
कधी काळी अगदी घाबरत बोलणारी व्यक्तीसुध्दा कालांतराने खूप छान पध्दतीने, लोकांना आवडेल अशा आकर्षक पध्दतीने बोलू शकते. प्रयत्नांती सगळं काही शक्य आहे. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' असं समर्थ रामदासांनी सांगितलेलंच आहे.
'यत्न तो देव जाणावा' हे समर्थांचं वचनसुध्दा तितक्याच गंभीरपणानं घेणं गरजेचं आहे. छान बोलण्यासाठी सर्वात आधी मनातली भीती घालवायला हवी. आणि त्यासाठी अर्थातच मग पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढवणं आलंच. अनेक वेळा बोलताना जे अनावश्यक 'फिलर्स' येतात, ते टाळायला हवेत. आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक विचार करून आपल्या बोलण्यावर आणि त्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व विकासावर काम करायला हवं.
साधारणपणे 36-37 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी एका एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घेतला होता. नाटकाची, अभिनयाची आवड नुकतीच निर्माण व्हायला लागली होती. शाळेत असताना एक एकांकिका स्वत: लिहून दिग्दर्शित केली होती आणि त्यात अभिनय वगैरेही केला होता. तीच आवड नंतर कधीतरी वाढीला लागली असावी बहुतेक. तर त्या एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी आचार्य अत्रेंच्या 'तो मी नव्हेच' या नाटकाच्या अखेरच्या प्रवेशातल्या लखोबा लोखंडेच्या सफाईचा उतारा अगदी आठ-पंधरा दिवस घोकून घोकून तयार केला होता मी. साधारण 6-7 मिनिटांचा तो एकूण उतारा. धोतर, सदरा, गळ्यातली माळ, शबनम पिशवी वगैरे लखोबा लोखंडेसाठी लागणारी सगळी सामग्रीदेखील मी गोळा केली. बक्षीस मिळवणारच, अशा आविर्भावात सुरू केलेला स्पर्धेतला तो प्रवेश अडीच-तीन मिनिटांत कधी संपला आणि मी घामाघूम होऊन कधी खाली उतरलो, ते माझं मलाच कळलं नाही.
त्यावेळी ठरवलं की, यापुढे कधीही असं होऊ द्यायचं नाही. मग हे का झालं, याचा विचार केला. दोन गोष्टी स्पष्टपणे समोर आल्या. आपण जे करणार आहोत, ते चांगलं होईल का, ही धाकधूक आणि त्यामुळे निर्माण झालेली काहीशी भीती. आपण करू शकू, हा आत्मविश्वास होता, पण चांगलं होईल की नाही, ही भीतीही होती. मग मी काय केलं? वर्षभर चांगला सराव केला. भीती घालवून आत्मविश्वास वाढवण्याच्या, चांगलं बोलण्याच्या अभ्यासाबद्दलच्या ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आतापर्यंतच्या लेखांमध्ये केला, त्यांचा सराव केला. त्या अंगी बाणवल्या आणि पुढल्याच वर्षी बक्षीस मिळवलं. त्यानंतर जवळपास सगळ्याच एकपात्री स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवत गेलो. मग हळूहळू अन्य एकांकिका, नाटकांचा प्रवास सुरू झाला वगैरे.
बोलताना भीती वाटते, तेव्हा नक्की काय होतं? पुढे काय बोलावं सुचत नाही. नेमके शब्द सुचत नाहीत. नेमके शब्द न सुचल्यामुळे अडखळणं टाळण्यासाठीचा एक अभ्यास (शब्दसंग्रह वाढवण्याबद्दलचा) आपण मागल्या एका लेखात पाहिलेला आहेच. पण आत्ता आपण ज्या भीतीबद्दल बोलत आहोत, ती शब्द न सुचण्याबद्दलची नाहीये, तर आपण चुकणार तर नाही ना, आपण जे काही करू, ते बरोबर तर होईल ना, या विचारांमुळे निर्माण झालेली भीती आहे. मग अनेक वेळा होतं काय, आपल्याला जे काही बोलायचं आहे, ते आपण भराभरा बोलून टाकतो एकदाचं. आपण बोलतोय ते समोरच्यांना कळतंय, असं आपल्याला वाटतं. पण ते समोरच्यांना कळत नसतं आणि ते त्यांना कळत नाही, हे आपल्यालाही कळत नसतं. साहजिकच आपल्या बोलण्याचा कोणताही प्रभाव ऐकणार्यांवर पडत नाही. प्रभाव सोडा, पण आपलं बोलणं समोरच्यांपर्यंत पोहोचलेलंही नसतं. आपण जेव्हा भराभरा बोलतो तेव्हा आपल्या बोलण्यातली, मांडणीतली स्पष्टता निघून गेलेली असते. उरतं ते फक्त तोंडातून शब्द बाहेर पडणं. आपण बोललेलं समोरच्याला कळलंच नाही, तर काय?
यासाठीच अगदी शांतपणे, स्पष्टपणे आणि विचारपूर्वक बोलणं हा आपल्या वक्तृत्वामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा अगदी पहिला टप्पा आहे. मुद्द्यांची योग्य मांडणी याबद्दलही आपण मागे बोललो आहोत. ती मांडणी करताना अगदी शांतपणे, सावकाश बोलणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं बोलणं ऐकणार्याला नीटपणे कळतं आणि आपल्यालाही पुढे काय बोलायचं आहे, याचा विचार करण्यासाठी क्षणभर का होईना काहीसा वेळ मिळतो. यासाठी आपल्या बोलण्यात योग्य ते 'पॉजेस' (अल्प/स्वल्प/अर्ध/पूर्णविराम) असणं महत्त्वाचं आहे. सावकाश बोलण्यामुळे आपल्या 'बोलण्या'लाही एक विशिष्ट गती मिळते. आपल्या आवाजामध्ये, स्वरामध्ये वैविध्य असायला हवं. बोलताना नेमक्या आरोह-अवरोहांचा विचार करायला हवा. अगदी ढोबळ भाषेत बोलताना स्वर, आवाज वर-खाली व्हायला हवा. त्यामध्ये भावभावना स्पष्ट व्हायला हव्यात. शब्दांची नेमकी व सुसंगत मांडणी करणं आपल्याला कळलं पाहिजे.
…आणि हे सगळं नेमकेपणानं समजून घेण्यासाठी 1) आपली श्रवणशक्ती वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी खूप ऐका, वेगवेगळ्या प्रकारचे, आवाजाचे, शैलीचे वक्ते ऐका, गाणी ऐका; 2) आपण जे बघतो, ऐकतो आणि त्यातलं जे आपल्याला आवडतं, त्याची तात्पुरती नक्कल करण्याचा प्रयत्न करा. पण नक्कल करण्याचा प्रयत्न हा एका मर्यादेपुरताच असावा, जेणेकरून आपल्या मर्यादा ओळखता येऊन त्यापलीकडे जाणं आपल्याला शक्य होईल. एकदा का हे जमलं की आता यानंतर आपल्याला कोणाचीही नक्कल करायची नाही, तर आपल्याला स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी, हे डोक्यात ठसवा; 3) बोला - बोला - बोलत राहा. स्वत:ची खात्री पटेपर्यंत बोला. ते रेकॉर्ड करा. ऐका. पुन्हा रेकॉर्ड करा. पुन्हा ऐका; 4) आपण जे काही बोलतोय, ते ऐकून त्याचं स्वत:च विश्लेषण करा. थोडक्यात, स्वत:च स्वत:चे परीक्षक व्हा. स्वत:च स्वत:चं गुणांकन करा. अर्थात, यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वत:कडे त्रयस्थाच्या नजरेतून तटस्थपणे पाहता आलं पाहिजे. स्वत:च्याबाबतीतही कठोर होता आलं पाहिजे आपल्याला. सवयीने हळूहळू होत जाईल तेसुध्दा; 5) ऐकणं-बोलणं-पुन्हा ऐकणं-पुन्हा बोलणं…बघा, आपोआप बोलण्याची भीती कमी होत जाईल हळूहळू.
थोडक्यात काय, तर कधी काळी अगदी घाबरत बोलणारी व्यक्तीसुध्दा कालांतराने खूप छान पध्दतीने, लोकांना आवडेल अशा आकर्षक पध्दतीने बोलू शकते. प्रयत्नांती सगळं काही शक्य आहे. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे' असं समर्थ रामदासांनी सांगितलेलंच आहे. 'यत्न तो देव जाणावा' हे समर्थांचं वचनसुध्दा तितक्याच गंभीरपणानं घेणं गरजेचं आहे. छान बोलण्यासाठी सर्वात आधी मनातली भीती घालवायला हवी. आणि त्यासाठी अर्थातच मग पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढवणं आलंच. अनेक वेळा बोलताना जे अनावश्यक 'फिलर्स' येतात, ते टाळायला हवेत. आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक विचार करून आपल्या बोलण्यावर आणि त्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व विकासावर काम करायला हवं. या अगदी प्राथमिक किंवा मूलभूत गोष्टी जोपर्यंत आपण आपल्या मनावर बिंबवून घेत नाही, तोपर्यंत हे कठीण आहे. पण एकदा का तुम्हाला ते जमलं, की मग सगळंच सोपं!
अनेक वेळा बोलताना बरेच 'फीलर्स' वापरतो आपण. 'अंऽऽ…', 'ऊं…', 'म्हणजे…', 'मला काय/असं म्हणायचंय की…', 'ते…', 'हे…' हे सगळे फीलर्स आहेत. आपल्याला नेमक्या ठिकाणी नेमका शब्द न सुचल्यामुळे आता नेमकं काय बोलायचं, हे कळत नसतानाच्या परिस्थितीत आपल्या तोंडातून (मनातून ???) येणारे हे 'फीलर्स' आहेत. वर सांगितलेले 5 मुद्दे आचरणात आणले तर आपोआप हे 'अंऽऽ…', 'ऊं…', 'म्हणजे…' निघून जाईल आणि बोलण्यात चांगला सराईतपणा येईल. बघा, प्रयत्न करून. सुरुवात तर करा. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे'…

