Thursday, 01 Oct, 9.18 pm My महानगर

फिचर्स
खैरलांजी ते हाथरस आणि.

खैरलांजीच्या अमानवी घटनेला १४ वर्षे झाली. देशाच्या कानाकोपर्‍यात खालच्या मानल्या जाणार्‍या जातींवर होणारा अत्याचार ही देशात नेहमीची बाब असते. ही दिवसागणिक घडणारी घटना असल्यामुळे बातमीत त्याची जागा वर्तमानपत्रातल्या थोडक्यातल्या कॉलममध्ये अडीचशे शब्दांमध्ये संपवली जाते. ही घटना देशाच्या अर्थ, राज आणि समाजकारणावर परिणाम करत नाही. अनुसूचित जाती, मागास आणि नाही गटातील जाती जमातींवरील अत्याचारामुळे शेअर बाजार कोसळण्याचा धोका कधीच नसतो. दलित वस्तीमध्ये कुटुंबाला चिमुकल्यांसह जिवंत जाळल्याच्या बातमीमुळे देशातील किमान विकास दराला धोका पोहोचत नसतो.

देशातील सर्वहारा जाती जमातींचा नरकवास कायम असतो. या नरकवासी आजारातून सुटका करण्यासाठी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान नावाचे एक पुस्तक इथल्या व्यवस्थेला दिलेले असते. या पुस्तकाला एव्हाना ६० वर्षे उलटून गेलेली असतात. या पुस्तकात सामाजिक न्याय नावाचा एक महत्वाचा उपचार या अशा आजारांवर सांगितलेला असतो. मात्र सत्तेच्या साठमारीत गुंतलेल्या व्यवस्थेकडून हे प्रकरण कायमच दडपले जाते. त्याचा परिणाम हाथरसची घटना असतो.

वर्तमानपत्रातील कोपर्‍यात दलितांवरील आजचा अत्याचार असा एक रकाना ठेवायला हरकत नसावी. या रकान्यात मैला साफ करण्यासाठी मेनहोलच्या नरकात उतरलेल्या आजच्या अत्यवस्थ मजुरांची संख्या किंवा मृतांची माहिती, किंवा कचरा साफ करणार्‍या डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा वेचकांच्या वस्तीतील आजाराने मृत पावलेल्यांची संख्या देता येईल. या शिवाय अशा अति कमकुवत रस्त्याच्या कडेला राहाणार्‍या गटातील लहान मुलांच्या कुपोषण मृत्यू, महिलांचे अपुरे पोषण, गरोदरपणातील उपचाराअभावी झालेला मृत्यू, मजूर कामगारांच्या झालेल्या हत्या, केवळ उसने घेतलेले शंभर रुपये परत केले नाहीत म्हणून भोसकून झालेल्या मजुरांच्या आजच्या हत्या असे उपप्रकार या रकान्यात नोंदवता येईल. ज्याप्रमाणे रोजचे हवामान, तापमान किंवा सोन्या चांदीचे वधारणारे, घसरणारे दर रोजचे रोज बदणारे असतात, तसाच हा कायमस्वरुपी रकाना वर्तमानपत्रात करता येईल. या शिवाय शोषितांच्या वस्तीमध्ये व्यसने, अंधश्रद्धा, भूकबळी, किरकोळ हाणामारीत जखमी मृत्यू होणार्‍यांची भरही घालता येईल. त्यावर चॅनल्सवर रोजच्या रोज चर्चा झडवता येतील. साहित्यिकांना त्यावर पुरस्कारप्राप्त कादंबर्‍याही लिहिता येतील.

कवींना त्यांच्या अंगार फुलवणार्‍या कवितांसाठी हा विषय महत्वाचा असेल. व्यक्त होणारे आपल्या पद्धतीने व्यक्त होतीलच. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाणेनिधीचा विषय किंवा अवकाशात उपग्रह सोडल्याची दुर्मिळ घटना घडलेली नसेल तर या अशा रोज होणार्‍या मरणाच्या दिवसातील एके दिवशी या विषयाला वर्तमानपत्राच्या अग्रलेखाची जागा देण्याविषयी अभिजन, वैचारिक गटातील संपादकीय विभागाची यशावकाश त्या दिवशी बैठक होईल. हेही नसे थोडके..चॅनल्सवर मात्र गंभीर चेहरे घेऊन सामाजिक न्याय मंत्री, गृहमंत्री, सत्ताधारी राजकीय पक्षाचे प्रवक्ते दाखल झालेले असतील. राजकीय व्यवस्थेने आधीच नखं आणि दात काढलेल्या चळवळीचे काही वाघ स्टुडिओमधील छान छान दिसणार्‍या अँकरला खडा जयभीम घालून अभिवादन करतील. त्यावेळी छान छानपणे ओशाळून चेहर्‍यावर थोडासा तणाव आणत जुजबी नमस्काराने उत्तर दिले जाईल. त्यानंतर चर्चेला सुरुवात होईल. झालेली घटना अत्यंत नृशंस, अमानवी आहे. या घटनेची केंद्रीय तपास यंत्रणेकडून निष्पक्ष चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन झाले पाहिले, अशी मागणी आम्ही तातडीचा विशेष अधिवेशनात करणार आहोत, विरोधक बोलतील, त्यावर सत्ताधा-यांकडून वंचितांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील अ‍ॅट्रोसिटी केसेची माहिती सादर केली जाईल.

अरे हो, हे प्रकरण केवळ दलितांवरील अत्याचाराचे नसून एका महिलेचीही नृशंस, अमानवी आणि इतर अनेक नकारात्मक विशेषणे लावून केलेली हत्या असल्याचेही गहन चर्चेतून स्पष्ट केले जाईल. हा देश माता सीता, राधा, झाशीची राणी, माता रमाई, जिजामाई यांचा असल्याचे हा साक्षात्कार याआधी कधीही झालेला नव्हता, अशा अविर्भावात व्यक्त केला जाईल. छत्रपती शिवरायांनी असे कृत्य करणार्‍याचे हात पाय छाटले असते, शिवरायांचा एक मावळा गर्जेल, तर जिजाई, रमाई, सावित्रीच्या पोरीवर झालेला अत्याचार हा देश कधीही सहन करणार नाही. असे विद्रोही पक्षांकडून सांगितले जाईल. एव्हाना राजधानीत आणि देशातील उरलेल्या तीन महानगरात मेणबत्ती पेटवण्यासाठी चौकाचौकातील चौथरे राजकीय पक्षांच्या तळागाळातील कंत्राटी सफाई कामगार कार्यकर्त्यांकडून साफ केले जातील. त्यावेळी पक्षातील इतर कार्यकर्ते विशिष्ट अंतरावरून योग्य सूचना देतील. या वेळी पुन्हा प्रियंका भोतमांगे आणि भय्यालालचे कुटुंब यांची काळीज पिळवटून टाकाणारी आठवण काढली जाईल. भय्यालाल भोतमांगेला न्याय मिळालाच पाहिजे. देशातील, राज्यातील कामगार वस्त्या, भीमनगर, बुद्ध कॉलनीत बेंबीच्या देठापासून घोषणा होतील.

महामानवाच्या पुतळ्याखाली अभिवादन, श्रद्धांजली, निषेध सभा घेतल्या जातील. हे असं पांढरपेशा शहराच्या मधोमध सुरू असताना भोवतालच्या अभिजनांना दलितांवरील अत्याचाराच्या बातम्या अंगवळणी पडल्याने जगण्याचा भाग झालेल्या असतील. त्याला शहरातील अभिजनांकडून कौतुकानं शहरातील नागरिकांचं जगण्याचं स्पिरीट म्हटलं जाईल. हे सगळं सुरू असताना सोनाई, खर्डा, जवखेडा अशी चर्चा कानी पडेल. खैरलांजी हत्याकांडाशी फारकत घेऊन स्त्रीवादी निघून गेलेले असतील. तर शहरातील वंचितांच्या वाल्मिकी समुदायांच्या वस्तीत या विषयी कुठलीही चर्चा नसेल. कोरोना लॉकडाऊनमध्ये म्युनिसिपॅलिटी हॉस्पिटलच्या शवागारात साफसफाईच्या कामाची ड्युटी करताना कोरोनाने मेलेल्या बापाच्या जागेवर पोराला कसा चिकटवायचा या विवंचनेत असलेल्या आईला वाल्मिकी समुदायावर रोज कसा कुठे अत्याचार होतो, याविषयी काहीही माहीत नसेल. मॅनहोलमध्ये ड्युटी करताना दररोज दोन जण मरण पावतात, हे इथल्या मानवतावादी यंत्रणांना माहीत नसते. तर सफाई कामगारांना जाहीर कार्यक्रमात दोन हातमोजे देताना त्याचा फोटो वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर छापायला हवा, असा आग्रह स्थानिक नगरसेवकाचा असतो.

कामगार महिलांचे शोषण आणि त्यांच्या होणार्‍या हत्या ही नवी बाब नसते. हाथरसच्या घटनेत मृत मुलीची जीभ कापलीच नव्हती, तिच्यावर अत्याचार झालाच नव्हता किंवा पोलिसांनी तिचा मृतदेह जाळण्यामागील कारणांचे संदर्भासह स्पष्टीकरण काही चॅनल्सवर आरडाओरडीच्या पत्रकारितेतून दिले जात असते. खैरलांजीच्या घटनेचा निकाल अद्याप लागलेला नसतो. कोपर्डी, खर्डा, सोनई अशी ही जंत्री वाढत जात असतानाच उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये सामूहिक अत्याचाराची अशीच घटना पुन्हा घडते.

सत्ताधारी पक्ष या अत्याचारानंतर तपासण यंत्रणांसोबत पुढील अ-राजकीय रणनीती ठरवण्यात व्यग्र असताना विरोधी पक्षातील नेते घटनास्थळी अत्याचारीत तरुणीच्या कुटुंबियांची भेट घ्यायला जातात. त्यानंतर त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की केल्याची बातमी आणि भरमसाठ छायाचित्रे सोशल मीडियावर पडतात. आता राजकीय युद्ध सुरू होते. महिलांचा सन्मान करा, असे एकमेकांना आतापर्यंत सुनावणारे एकमेकांच्या आई, बहीण, पत्नी असलेल्या महिलांच्या अवयवांचा जाहीर उल्लेख करून एकेरीवर सोशल मीडियावरच शाब्दिक बलात्कार सुरू करतात. अंमली पदार्थाच्या आरोपाखाली चौकशी सुरू असलेल्या किंवा गैरवर्तन केले गेलेल्या एखाद्या स्त्रीवादी अभिनेत्रीचे या अत्याचाराबाबत मत विचारले जाते. सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योगपती, तारेतारका सर्वच या घटनांचा निषेध करतात. आपल्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी काळ्या रंगात रंगवतात. या तात्पुरत्या काळ्या रंगात रंगवलेल्या वातानुकूलित इंटरनेटी अंधाराला गावकुसाबाहेरच्या वाल्मिकी किंवा बुद्ध, भीमनगरातील रक्तात भिजलेल्या अंधाराशी काहीही देणेघेणे नसते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top