Monday, 22 Jul, 4.40 am My महानगर

क्रीडा
कोहलीच कर्णधार; श्रेयस अय्यर वनडे, टी-२० संघात

आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यातील तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा करण्यात आली. भारताला विश्वचषक जिंकण्यात अपयश आल्याने विराट कोहलीकडून एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात येईल, तसेच त्याला विंडीज दौर्‍यातील काही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती, परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तो तिन्ही मालिकांमध्ये खेळणार असून तोच भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. अनुभवी महेंद्रसिंग धोनीने याआधीच या दौर्‍यात खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्याने त्याचा विचार करण्यात आला नाही. मुंबईकर श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे या फलंदाजांना एकदिवसीय, टी-२० संघात स्थान मिळाले आहे. अय्यरने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी २०१८ मध्ये खेळला होता. मात्र, त्याने आयपीएल, स्थानिक क्रिकेट आणि भारत 'अ' संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी तो प्रबळ दावेदार मानला जात आहे. युवा फलंदाज शुभमन गिलला मात्र कोणत्याही संघात स्थान मिळालेले नाही.

सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या जसप्रीत बुमराहला एकदिवसीय आणि टी-२० मालिकांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, या दौर्‍यातील कसोटी सामने हे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पहिले सामने असल्याने त्याची कसोटी मालिकेसाठी निवड झाली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याला मागील काही काळात पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे एम.एस.के प्रसाद यांच्या निवड समितीने त्याला संपूर्ण दौर्‍यासाठीच विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवनला विश्वचषकादरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. परंतु, तो आता फिट झाला असून मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये खेळणार आहे. कसोटी संघात मात्र त्याला किंवा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला स्थान मिळालेले नाही. कसोटी संघात सलामीवीर म्हणून मयांक अगरवाल आणि लोकेश राहुलची निवड झाली आहे. विश्वचषकात अष्टपैलू विजय शंकरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी मयांकला संधी देण्यात आली होती. मात्र, विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात त्याला स्थान मिळालेले नाही. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणार्‍या रोहित शर्माला कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. तसेच कसोटी संघात यष्टीरक्षक वृद्धिमान साहाचे पुनरागमन झाले आहे.

एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, तर टी-२० मालिकेसाठी लेगस्पिनर राहुल चहर या नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मागील एक-दोन वर्षांत स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीचा त्यांना फायदा झाला आहे. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदचे एकदिवसीय आणि टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.
३ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या या दौर्‍यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

एकदिवसीय संघ-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

टी-२० संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी

कसोटी संघ -

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top