स्वतःच्या नावावर एक प्लॉट किंवा जमीन असावी, हे अनेकांचं स्वप्न असतं. शहराच्या गोंधळापासून दूर एखादं घर बांधण्याची इच्छा अनेकजण बाळगतात. पण प्रत्यक्षात जमीन खरेदी करताना 'गुंठा', 'एकर' आणि 'स्क्वेअर फूट' यांसारखे शब्द समोर आले की अनेकजण गोंधळून जातात.
हाच गोंधळ अनेकदा चुकीचे व्यवहार आणि आर्थिक नुकसान होण्याचं कारण ठरतो. त्यामुळे जमीन खरेदीपूर्वी तिचं मोजमाप नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. (land measurement acre guntha square feet guide)
जमिनीच्या मोजमापात का होतो गोंधळ?
भारतामध्ये सर्वत्र एकसारखी मोजमाप पद्धत वापरली जात नाही. ग्रामीण भागात गुंठा, एकर, बिघा यांचा वापर होतो तर शहरांमध्ये स्क्वेअर फूट किंवा स्क्वेअर मीटर प्रचलित आहे या वेगवेगळ्या पद्धतींमुळे नेमकी किती जमीन घेतोय, याचा अंदाज अनेकदा चुकतो.
एकर आणि गुंठ्याचं सोपं गणित
जमीन व्यवहारात लक्षात ठेवण्यासारखं महत्त्वाचं सूत्र म्हणजे > 1 एकर = 40 गुंठे 20 गुंठे = 0.5 एकर (अर्धा एकर) हे बेसिक गणित लक्षात ठेवल्यास तुम्ही व्यवहार करताना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकता.
स्क्वेअर फूटमध्ये जमिनीचं मोजमाप
शहरांमध्ये प्लॉट किंवा घर स्क्वेअर फूटमध्ये मोजलं जातं. 1 गुंठा = 1089 स्क्वेअर फूट तर 1 एकर = 43560 स्क्वेअर फूट हे आकडे माहित असल्यास प्लॉटची किंमत, बांधकामाची योजना आणि जागेचा योग्य अंदाज घेणं सोपं होतं.
मोबाईल ॲप्सवर पूर्ण विश्वास ठेवता?
हल्ली जमीन मोजण्यासाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. हे ॲप्स सॅटेलाईटच्या आधारे मोजमाप दाखवतात.मात्र प्रत्येक वेळेस ते अचूक असतीलच असं नाही झाडं, भूप्रदेश किंवा जुने नकाशे यामुळे फरक पडू शकतो म्हणून अंतिम व्यवहारापूर्वी अधिकृत भूमापकाकडून मोजणी करून घेणं अधिक सुरक्षित ठरतं.
जमीन खरेदीपूर्वी घ्यायची काळजी
1. कागदपत्रांची खात्री करा
७/१२ उतारा, फेरफार नोंदी आणि मालकी हक्क स्पष्टपणे तपासा.
2. प्रत्यक्ष जागेची पडताळणी करा
कागदावर दिलेलं मोजमाप आणि प्रत्यक्ष जागेवरील हद्द जुळते का, हे पाहणं आवश्यक आहे.
3. तज्ज्ञांचा सल्ला घ्या
कायदेशीर बाबी समजत नसतील तर अनुभवी व्यक्ती किंवा सल्लागारांची मदत घ्या.
4. घाईत निर्णय घेऊ नका
किंमत कमी आहे म्हणून किंवा दबावाखाली येऊन व्यवहार करू नका. प्रत्येक गोष्ट नीट तपासूनच पुढे जा.
जमीन खरेदी हा आयुष्यातील मोठा निर्णय असतो. थोडीशी माहिती आणि योग्य गणित समजून घेतल्यास मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे गुंठा, एकर आणि स्क्वेअर फूट यांचं गणित समजून घेणं महत्वाचं आहे आणि सुरक्षित गुंतावणीसाठी आवश्यक जबाबदारी सुद्धा.

