Dailyhunt
Maharashtra Board HSC Results 2026 : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, 2 मे रोजी जाहीर बारावीचा निकाल

Maharashtra Board HSC Results 2026 : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, 2 मे रोजी जाहीर बारावीचा निकाल

मुंबई : बहुप्रतिक्षित आणि विद्यार्थ्यांसोबतच पालकांना उत्सुकता असलेला बारावी बोर्डाचा निकाल शनिवारी, 2 मे ला जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्या विविध संकेस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

परंतु, त्याआधी शनिवारी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून अधिकारी किती विद्यार्थी पास झाले, किती विद्यार्थी नापास झाले, किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, मुलींची पास होण्याची टक्केवारी किती, मुलांची पास होण्याची टक्केवारी किती, कोणत्या जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला, अशी सर्व माहिती जाहीर करतील.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. काही दिवसांपूर्वी "Class 12th Result 2026 Coming Soon", असा मेसेज डिजी लॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला होता. त्यामुळे निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं संकेत या मेसेजद्वारे देण्यात आले होते. हा निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहितीही समोर आली होती. त्यामुळे आता शनिवारी विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी हॉल तिकिटवर असलेला त्यांचा बैठक क्रमांक आणि अर्जावरील आईच्या नावाची असलेली नोंद पाहावी.

या संकेतस्थळांवर पाहा निकाल

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी रविवार दिनांक 03/05/2026 से रविवार दिनांक 17/05/2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar