महाराष्ट्र दिन म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो मराठमोळा थाट नऊवारी साडी, नथ, ठुशी आणि कपाळावर नाजूकपणे उमटलेली 'चंद्रकोर'. हल्लीच्या जनरेशनमध्येही तरुणी असो वा महिला खास सण,लग्न सोहळा किंवा मराठमोळ्या फोटोशूटसाठी हा लूक करताना दिसतात.
कारण चंद्रकोर ही फक्त एक टिकली नाही, तर ती मराठी ओळखीची, परंपरेची आणि अभिमानाची खूण आहे. (maharashtra day chandrakor bindi tradition meaning)
ही छोटीशी चंद्रकोर कपाळावर लावताच संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच आत्मविश्वास आणि आकर्षण येतं. म्हणूनच, काळ बदलला तरी चंद्रकोरीचं महत्त्व अजूनही तितकंच कायम आहे.
चंद्रकोरची परंपरा
असं मानलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात चंद्रकोर लावण्याची परंपरा अधिक प्रचलित होती. त्या काळात स्त्रिया आणि पुरुष दोघेही कपाळावर चंद्रकोर रेखाटायचे. विशेष तांब्याच्या साच्याचा वापर करून कुंकवाने किंवा चंदनाने ही चंद्रकोर काढली जात असे. काही जुन्या चित्रांमध्ये आणि प्रतिमांमध्येही चंद्रकोर दिसून येते, जी त्या काळातील सांस्कृतिक ओळख अधोरेखित करते.
सौंदर्य आणि ओळखीचं प्रतीक
मराठी स्त्रीच्या पारंपरिक लूकमध्ये चंद्रकोर ही एक खास ओळख आहे. जशी नथ, किंवा इतर दागिने तिचं सौंदर्य खुलवतात, तशीच चंद्रकोर तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच शान देते.
आधुनिक काळातील ट्रेंड
हल्ली बाजारात चंद्रकोर टिकल्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत साध्या डिझाईनपासून ते खडे, मोती आणि स्टायलिश टच असलेल्या टिकल्या. त्यामुळे पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचाही सुंदर मिलाफ दिसतो.
आजच्या तरुणाईमध्येही चंद्रकोरची क्रेझ कमी झालेली नाही. महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, लग्नसमारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनेक मुली हा लूक खास करून कॅरी करतात.

