Tuesday, 04 May, 4.10 pm My महानगर

महाराष्ट्र
maharashtra lockdown 2021: पश्चिम महाराष्ट्रात ३ जिल्ह्यांत लॉकडाऊनचा 'कडक' कार्यक्रम, कसे आहे वेळापत्रक?

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येने लाखोंचा आकडा पार केला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परंतु या लॉकडाऊन दरम्यानही कोरोना रुग्णसंख्या थांबण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, बारामती, पुणे आणि आता कोल्हापूरात पुढील ७ ते १० दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीत पुढील ७ दिवस तर कोल्हापूरात पुढील १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन असणार आहे, त्याचप्रमाणे बारामतीतही उद्यापासून पुढीस सात दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे.

सांगलीत ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने दीड हजारांचा आकडा ओलांडला आहे तर सोमवारी तब्बल ४० रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना कोरोनावर मात करण्यासाठी तुमचा मदतीची गरज असल्याचे सांगत त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा' असे आवाहनही केले आहे. सांगलीतील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही जयंत पाटील यांनी दिले.

१५ मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यात गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्येत घट झाली असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांचा दर कमी झालेला नाही. सध्या कोल्हापूरात २४०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे कोल्हापूरतही ५ मेपासून सकाळी ११ वाजल्य़ापासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. थोड्याच वेळातच यासंदर्भातील नियमावली जारी केली जाणार आहे. यापूर्वी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काही दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी होती. मात्र आता अत्यावश्यक सेवेतील दुकांनाच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा, असे पालकमंत्री सतेज पाटील यावेळी म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत लॉकडाऊन निर्णय करण्यात आला. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बारामतीत सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन

बारामती जिल्ह्यातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे बारामतीतही बुधवारपासून ( ५ मे) पासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बारामती प्रशासनाने ५ ते ११ मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन घोषित केला. यामुळे उद्यापासून बारामतीत दूध विक्रीसाठी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मुभा असेल. तर मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे. गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक घेत बारामती तालुक्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती अजित पवारांनी जाणून घेतली होती. अजित पवार यांनी बारामतीतल्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top