Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्रातील एसटींचा सुरतमध्ये भीषण अपघात, काही सेकंदात सात जणांचा होरपळून मृत्यू

महाराष्ट्रातील एसटींचा सुरतमध्ये भीषण अपघात, काही सेकंदात सात जणांचा होरपळून मृत्यू

सुरत : धुळे - सुरत महामार्गावर आज मंगळवारी (ता. 2 जून) साधारणतः सायंकाळी 5 वाजता झालेल्या भीषण अपघातामुळे खळबळ उडाली आहे. दोन बसेसमध्ये झालेला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झालेल्या दोन्ही बसेस या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात महाराष्ट्राच्या लाल परी म्हणजेच एसटी आहेत. गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील बारडोली येथील उवा आणि मानेकपोर गावादरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातस्थळी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. मात्र, हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी धुळे - सुरत महामार्गावरील बारडोली आणि उवा गावादरम्यान एक टँकर पलटी झाला होता. त्यामुळे या पलटी झालेल्या टँकरला धडक टाळण्यासाठी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या एसटी बस चालकाने गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या दुसऱ्या एका भरधाव एसटी बसला या बसने जोरदार धडक दिली. ही समोरासमोरची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले. एका बसचा समोरचा भागाचा चेंदामेंदा झाला असून, दुसरी बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली.

धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावरून खाली गेलेली बस सीएनजीवर चालणारी होती. धडक बसताच इंधनाची गळती होऊन बसला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांमुळे नागरिकही घाबरले. यावेळी बस उलटून आग लागल्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. यासोबतच, बारडोली अग्निशमन दलाचे पथक आणि बारडोली शहर पोलिसांचा एक मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाकडून बसला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ज्यानंतर साधारणतः अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar