Wednesday, 15 Sep, 4.27 pm My महानगर

ताज्या बातम्या
महिला आयोग अध्यक्षपदी कोण?, राष्ट्रवादीच्या या 'दोन' नावांची जोरदार चर्चा

महाविकास आघाडी सरकारमध्ये मागील २० महिन्यांपासून महिला आयोग अध्यक्षपद रिक्त आहे. या महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु काँग्रेसनेही महिला आयोग उपाध्यक्षपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्यास दोन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. ते म्हणचे माजी आमदार विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दोन नावांची चर्चा आघाडीवर आहे. तर माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांचेही नाव चर्चेत आहे. काँग्रेसने महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नावाची शिफारस केली होती परंतु ही शिफारस मागे पडली असल्यामुळे अध्यक्षपद कोणाकडे जातंय हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईत काही दिवसांपुर्वी साकीनाका येथे घडलेल्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर विरोधकांनी टीका केली आहे. कोरोना काळात कोविड सेंटर आणि इतर ठिकाणी महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. साकीनाका येथील एका पीडितेवर बलात्कार झाला होता यानंतर पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्य सरकार महिला सुरक्षेच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेत आहे. यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर सक्षम महिला पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र ही शिफारस मागे पडली असल्यामुळे हे पद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीकडे गेल्यास रुपाली चाकणकर आणि विद्या चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. विद्या चव्हाण या मागील २५ वर्षांपासून महिलांच्या प्रश्नांवर काम करत आहेत. मुंबईमधील झोपडपट्टीतील महिलांच्या प्रश्नांवर विद्या चव्हाण लढा देत आहेत. तर रुपाली चाकणकर यांनी अल्पावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे उत्तम नेतृत्व केलं आहे. चाकणकर याच्यानंतर माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांच्या नावाची चर्चा आहे.


: OBC आंदोलन : नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, बावनकुळेंचा ठाकरे सरकारला इशारा


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top