Saturday, 14 Dec, 2.22 pm My महानगर

ताज्या बातम्या
'माझं नाव राहुल गांधी आहे, सावरकर नाही, मी कदापी माफी मागणार नाही'

'रेप इन इंडिया' या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. "माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही," अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. रामलीला मैदानावर सुरू असलेल्या काँग्रेसच्या 'भारत बचाव रॅली'दरम्यान ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की

काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल. या देशाची शक्ती या देशाची अर्थव्यवस्था होती मात्र आज ती राहिलेली नाही. संपूर्ण जग मिळून भारताच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक करत होतं. जग आशियाचे भविष्य चीन आणि भारत असल्याचं सांगत होतं. त्यामुळे या शक्तीला 'चिंडिया' नावानं संबोधलं जात होतं. मात्र, आता आपण दोनशे रुपये किलोनं कांदा विकत घेत आहोत. मोदींनी नोटाबंदी करुन स्वतः देशाची अर्थव्यवस्था संपवली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

काय आहे प्रकरण

झारखंडमधील एका जाहीर सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, झारखंडपासून उत्तर प्रदेशपर्यंत कुठेही , बलात्काराच्या घटना वाढत आहेत. भाजपाचे एक आमदारही बलात्काराच्या खटल्यात आरोपी आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावरही काही बोलत नाहीत. पंतप्रधान 'बेटी बचाव'चा नारा देतात. परंतु कोणापासून मुलींचं संरक्षण करायचं हे सांगत नाही. त्यांना भाजपाच्या आमदारांपासून वाचवण्याची गरज आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या 'रेप इन इंडिया' या वक्तव्यावरून शुक्रवारी लोकसभेत भाजप नेत्यांचा गदारोळ पहायला मिळाला. खासदार स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपण कधीही त्यांची माफी मागणार नाही, असे म्हटले असून महत्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेने नागरिकत्वाच्या बाजूने रहावे; आमची राजकीय तडजोड करण्याची तयारी - शेलार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top