नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट झाले असून गेल्या 15 वर्षांपासून या राज्यात असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. 2016 आणि 2021 मध्ये पराभव सामना करणाऱ्या भाजपाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अखेर सत्ता स्थापन केली आहे.
भाजपने पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता स्थापन करत ममता बॅनर्जी यांना आधीच धक्का दिला होता. मात्र आता भाजपचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव करत त्यांना दुसरा धक्का दिला आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालची सत्ता गमावलेल्या ममता बॅनर्जी यांची आमदारकीही गेली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख तथा उमेदवार ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा सुमारे 15,114 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. दणदणीत विजय मिळवल्यानंतर सुवेंदू अधिकारी म्हणाले की, हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभव करणे हे अत्यंत आवश्यक होते. या विजयाने ममता बॅनर्जी यांच्या राजकीय पर्वाचा अंत झाला आहे. पुन्हा एकदा त्या 15,000 हून अधिक मतांच्या फरकाने पराभूत झाल्या आहेत.

