Tuesday, 15 Jun, 3.10 pm My महानगर

देश-विदेश
मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावाने चंदा हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा - सचिन सावंत

अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटातच १८.५ कोटी रुपयांना विकत घेऊन मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून लज्जाहिनतेने भाविकांच्या श्रद्धेशी चालवलेला हा खेळ आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामाच्या नावावर लोकांच्या भावनेशी खेळून चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलेला आहे, काँग्रेस ने जानेवारी महिन्यात जनतेची लूट होऊ शकते हा दिलेला धोक्याचा इशारा योग्य ठरला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, रामाच्या नावावर पैसा वसुलीचा धंदा सुरु असल्याचे आम्ही यापूर्वीही अनेकदा निदर्शनास आणून दिले आहे. परंतु धर्माचे ठेकेदार आपणच असल्याच्या अविर्भावात रामाच्या नावाने खुलेआमपणे पैसे कमावून लोकांच्या श्रद्धेशी खेळ चालवला आहे. बाबा हरिदास यांची मूळ जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आणि तीच जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला १८.५ कोटी रुपयात विकण्यात आली. हा व्यवहार फक्त काही मिनिटांत झाला. एवढ्या कमी वेळात एका जमीनीचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे काय वाढू शकतात. या जमीन व्यवहारासाठी एवढा मोठा मोबदला देऊन राम मंदिरासाठी पैसे दिलेल्या लोकांचा विश्वासघात केला आहे, याची चौकशी झाली पाहिजे.

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात असताना भाजपा व आरएसएसने देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा केले. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता आम्ही जानेवारीमध्येच व्यक्त केली होती. भाजपा व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ साली विश्व हिंदू परिषदेतर्फे १४०० कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही. ४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपातर्फे राम मंदिर निर्मितीकरता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला होता. गेल्या तीन दशकामध्ये राम मंदिरासाठी जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही. रामाच्या नावावर खोट्या पावत्या, वेबसाईट निर्माण करून लोकांकडून पैसे वसूल केले गेले त्याचा कोणताच हिशोब नाही.

अध्योधेत राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे परंतु रामाच्या नावावर चालवलेला हा बाजार अत्यंत लांछनास्पद आहे. रामाच्या नावावर राजरोसपणे लोकांच्या भावनेशी खेळून अशा घोटाळ्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, हिंदूविरोधी ठरवून आपल्या काळ्या धंद्यावर पांघरून घालण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार रामभक्तांचा अपमान करणारा असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी हीच आमच्या सारख्या रामभक्तांची मागणी आहे, असेही सावंत म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top