Thursday, 03 Oct, 5.40 am My महानगर

क्रीडा
मयांक, रो'हिट' शो!

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळणार्‍या रोहित शर्माचे शतक आणि त्याचा सलामीचा साथी मयांक अगरवालच्या अप्रतिम फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताची बिनबाद २०२ अशी धावसंख्या होती. पावसाला सुरुवात झाल्यामुळे ५९.१ षटकांनंतर चहापानाची विश्रांती घेण्यात आली. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. पहिल्या दिवसअखेर रोहित ११५, तर मयांक ८४ धावांवर नाबाद होता. परदेशात चांगली कामगिरी करण्यात अपयश आलेल्या रोहितची भारतात कसोटी सामना खेळताना ५० पेक्षा जास्त धावा करण्याची ही सलग सहावी वेळ होती.

विशाखापट्टणम येथे होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांची आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र सलामी करण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, असे असतानाही या दोघांमध्ये ताळमेळाची कमतरता नव्हती. या दोघांनी डावाच्या सुरुवातीला सावधपणे फलंदाजी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही त्यांना काही वेळा अडचणीत टाकले. त्यामुळे विसाव्या षटकात भारताच्या ५० धावा फलकावर लागल्या. परंतु, यानंतर रोहितने धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने खासकरून दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंवर हल्ला चढवला. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डावखुरा फिरकीपटू सेनूरन मुथुस्वामी टाकत असलेल्या या डावाच्या २९ व्या षटकात रोहितने चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. लंचपर्यंत भारताची बिनबाद ९१ अशी धावसंख्या होती.

लंचनंतर सुरुवातीच्या काही षटकांत भारतीय सलामीवीरांनी पुन्हा सावध खेळ केला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ५ पैकी ३ षटके निर्धाव टाकली. मात्र, लंचनंतरच्या सहाव्या षटकात मयांकने चौकार लगावत भारताचे शतक फलकावर लावले. पुढच्याच षटकात त्याने षटकार लगावत ११४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील चौथे अर्धशतक होते. त्याने आणि रोहितने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. रोहितने ऑफस्पिनर डीन पायेडच्या एकाच षटकात दोन षटकार ठोकले. त्यानंतर मुथुस्वामीच्या षटकात १ धाव काढत त्याने १५४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील चौथे शतक होते.

शतक पूर्ण झाल्यानंतरही त्याने चांगली फलंदाजी सुरू ठेवली. ५९ व्या षटकात मयांकने चौकार लगावला आणि भारताच्या २०० धावा पूर्ण केल्या. पुढील षटकात पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला. पहिल्या दिवशी रोहितने १७४ चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ११५ धावा केल्या. संयमाने खेळणारा मयांक ८४ धावांवर नाबाद होता. १८३ चेंडू खेळलेल्या मयांकच्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक -
भारत : पहिला डाव ५९.१ षटकांत बिनबाद २०२ (रोहित शर्मा नाबाद ११५, मयांक अगरवाल नाबाद ८४; सेनूरन मुथुस्वामी ०/२३) वि. दक्षिण आफ्रिका.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top