Friday, 04 Oct, 5.40 am My महानगर

क्रीडा
मयांकचा 'डबल' धमाका

सलामीवीर मयांक अगरवालने आपल्या पहिल्या कसोटी शतकाचे द्विशतकात रूपांतर केल्याने भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिला डाव ७ बाद ५०२ धावांवर घोषित केला. मयांकने ३७१ चेंडूत २३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने २१५ धावांची खेळी केली. तसेच त्याने रोहित शर्मासह पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागी केली. याचे उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची दुसर्‍या दिवसअखेर ३ बाद ३९ अशी अवस्था होती. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने एडन मार्करम (५) आणि थानीस डी ब्रून (४) यांना झटपट माघारी पाठवले. नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या डीन पायेडला खातेही उघडता आले नाही. त्याला रविंद्र जाडेजाने बाद केले. डीन एल्गरने एकाकी झुंज दिली. दिवसअखेर तो २७ धावांवर नाबाद होता.

दुसर्‍या दिवशी बिनबाद २०२ वरून पुढे खेळताना भारताचे सलामीवीर मयांक आणि रोहित यांनी दमदार फलंदाजी सुरू ठेवली. पहिल्या दिवसअखेर ८४ धावांवर नाबाद असलेल्या मयांकने २०४ चेंडूत आपले कसोटीतील पहिले शतक पूर्ण केले. पहिल्या दिवशी शतकी खेळी करणार्‍या रोहितने दुसर्‍या दिवशीही चांगली फलंदाजी करत २२४ चेंडूत आपल्या १५० धावा पूर्ण केल्या. १५० धावांचा टप्पा पार करण्याची ही रोहितची दुसरी वेळ होती. यानंतर रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी त्रिकूटाविरुद्ध आक्रमकपणे फलंदाजी केली. मात्र, याच नादात तो १७६ धावांवर बाद झाला. केशव महाराजच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकने त्याला यष्टिचित केले. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. ६ धावांवर त्याचा व्हर्नोन फिलँडरने त्रिफळा उडवला.

मयांकने मात्र एक बाजू लावून धरत २९४ चेंडूत १५० धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीला अवघ्या २० धावांवर डावखुरा फिरकीपटू सेनूरन मुथुस्वामीने बाद केले. ही मुथुस्वामीची कसोटीतील पहिली विकेट होती. मयांकने धावफलक हलता ठेवत ३५८ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. कसोटीत पहिल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. त्याने १०० ते २०० या शंभर धावा १५४ चेंडूत केल्या. महाराजने अजिंक्य रहाणेला केवळ १५ धावाच करू दिल्या. दोन षटकांनंतर मयांक २१५ धावांवर माघारी परतला. त्याला डीन एल्गरने बाद केले. यानंतर हनुमा विहारी (१०) आणि वृद्धिमान साहा (२१) हे झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात बाद झाले. मात्र, जाडेजाने नाबाद ३० धावा करत भारताच्या ५०० धावा फलकावर लावल्या.

संक्षिप्त धावफलक -

भारत : पहिला डाव - ७ बाद ५०२ डाव घोषित (मयांक २१५, रोहित १७६, जाडेजा नाबाद ३०; महाराज ३/१८९) वि. दक्षिण आफ्रिका : पहिला डाव - २० षटकांत ३ बाद ३९ (एल्गर नाबाद २७; अश्विन २/९, जाडेजा १/२१).

पहिल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा चौथा भारतीय!
भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २१५ धावांची खेळी केली. त्याने २०४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक होते. त्यानंतर त्याने धावांची गती वाढवत ३५८ चेंडूत द्विशतक झळकावले. आपल्या पहिल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा मयांक भारताचा चौथा फलंदाज आहे. मयांकच्या आधी हा पराक्रम दिलीप सरदेसाई (नाबाद २००), विनोद कांबळी (२२४) आणि करुण नायर (नाबाद ३०३) यांनी केला होता.

मयांक-रोहितची विक्रमी भागीदारी

मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा या भारताच्या सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजी करत ३१७ धावांची भागीदारी केली. भारताच्या सलामीवीरांनी कसोटीत त्रिशतकी भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ होती. याआधी विनू मंकड आणि पंकज रॉय यांनी १९५६ साली पाकिस्तानविरुद्ध ४१३ धावांची सलामी दिली होती, तर विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी पाकिस्तानविरुद्धच २००६ साली पहिल्या विकेटसाठी ४१० धावांची भागीदारी केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top