- सुनील मेहरोत्रा
मुंबई : मीरा रोडवरील नुकत्याच झालेल्या खळबळजनक 'लोन वुल्फ' हल्ल्याच्या तपासात एक नवीन धक्कदायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) ठाण्यातील विशेष न्यायालयाला माहिती दिली की, अटक करण्यात आलेला आरोपी झैब झुबेर अन्सारीच्या कट्टरतेमागे त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा हात असू शकतो.
एटीएसचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने 31 वर्षीय अन्सारीची पोलीस कोठडी 11 मे पर्यंत वाढवली, जेणेकरून या दहशतवादी कटाच्या मुळाशी तपास यंत्रणा पोहोचू शकेल.
अन्सारीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना सरकारी वकील संजय मोरे यांनी युक्तिवाद केला की, हे प्रकरण फक्त एका हिंसक हल्ल्याचे नसून, त्यामध्ये खोलवर रुजलेली कट्टरता आणि संभाव्य दहशतवादी नेटवर्कचा समावेश आहे. एटीएसने अन्सारीविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. वकील मोरे यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी एका प्रशिक्षित 'लोन वुल्फ' हल्लेखोराप्रमाणे वागत होता, जो एकट्याने मोठा हल्ला करण्यास तयार होता. तपास यंत्रणा आता त्या सर्व संशयितांना ओळखण्याचे काम करत आहे, ज्यांच्या संपर्कात अन्सारी वेळोवेळी झाला होता.
एटीएसने अन्सारीच्या घराची झडती घेतली असता, अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे त्याच्या दहशतवादी प्रवृत्तीची पुष्टी झाली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या ताब्यात खिलाफतीची शपथ (बात) असलेली कागदपत्रे सापडली, ज्यावर आयएसआयएस (ISIS) सारख्या बंदी घातलेल्या संघटनांची नावे तसेच भारताविरुद्ध युद्धाचे आवाहन करणाऱ्या प्रक्षोभक घोषणा होत्या. एटीएसच्या म्हणण्यानुसार, 27 एप्रिल रोजी मीरा रोडच्या नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर, अन्सारी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लगेच घरी गेला. त्याने आपल्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपमधील सर्व डेटा डिलीट केला.
एटीएस आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या मदतीने डिलीट केलेल्या डेटाच्या मिरर इमेजेस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून डिजिटल फूटप्रिंट्सच्या आधारे त्याच्या सूत्रधारांना ओळखता येईल. तथापि, आतापर्यंतच्या प्राथमिक तपासामुळे एटीएसला त्याच्या माजी पत्नीवर संशय आला आहे. तपास अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे की, अन्सारीने 2013 मध्ये एका अफगाण-अमेरिकन नागरिकेशी लग्न केले होते, परंतु 2015मध्ये हा विवाह संपुष्टात आला. ती महिला काही काळ भारतात राहिली, परंतु भारतीय वातावरणाशी जुळवून घेता येत नसल्याचे कारण देत तिने त्याला घटस्फोट दिला आणि निघून गेली. एटीएसला संशय आहे की, याच काळात तिने अन्सारीच्या मनात कट्टरतावादाची विचारसरणी रुजवली.
अन्सारीच्या पार्श्वभूमीबद्दलच्या माहितीनुसार, त्याचे कुटुंब लहानपणी कुर्ल्यातील टॅक्सीमेन कॉलनीत राहत होते. त्यानंतर ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. अन्सारी अमेरिकेतही बराच काळ राहिला, परंतु त्याचा वर्क व्हिसा संपल्यानंतर त्याला भारतात परतावे लागले. तो मीरा रोडच्या नया नगरमधील एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहत होता. संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) विद्यार्थ्यांना ऑनलाइन गणित आणि विज्ञान शिकवत होता. शिकवणीच्या नावाखाली तो आपल्या विद्यार्थ्यांना कट्टरतावादी विचारांनी प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होता का? याचा एटीएस आता बारकाईने तपास करत आहे. एजन्सी त्याच्या घरातून जप्त केलेल्या पत्रकांशी जुळवून पाहण्यासाठी हस्ताक्षराचे नमुनेही गोळा करत आहे.
दुसरीकडे, बचाव पक्षाचे वकील वहाब खान यांनी हे आरोप तीव्रपणे फेटाळून लावले आणि दावा केला की त्यांच्या अशिलाला स्किझोफ्रेनिया नावाचा गंभीर मानसिक आजार आहे. वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, अन्सारीच्या कुटुंबीयांनी अमेरिकेतून याची पुष्टी केली आहे की, त्याच्यावर या आजारासाठी पूर्वी उपचार करण्यात आले होते आणि याच मानसिक स्थितीमुळे तो एकाकी आणि एकांतप्रिय झाला होता. बचाव पक्षाने न्यायालयाला अन्सारीचे मानसशास्त्रीय प्रोफाइल तयार करण्याची आणि डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्याची तपासणी करून घेण्याची विनंती केली. यानंतर, विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एटीएसला आरोपीची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले.

