मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीचे जागावाटप आज (31 मे) अखेर अंतिम झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर महायुतीमध्ये 11 - 4 -2 अशाप्रकारे जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले.
या नव्या फॉर्म्युल्यानुसार महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. अशातच भाजपने आता 11 जागांसाठी ज्यात पोटनिवडणुकीचा समावेश आहे, अशा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (30 मे) भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला होता. प्राजक्त तनुपरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता समोर आली होती. मात्र आता भाजपने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून उमेदवारी मिळाल्याचे समोर येत आहे. तसेच सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणी यांनाही वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून 2026 ही आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळालेवे सर्व उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कोणाला कुठून उमेदवारी मिळाली?
- अरुण लखानी - वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
- अविनाश ब्राह्मणकर - भंडारा-गोंदिया
- प्रविण पोटे पाटील - अमरावती
- धैर्यशील कदम - सांगली-सातारा
- राजेंद्र राऊत - सोलापूर
- प्राजक्त तनपुरे - अहिल्यानगर
- सुहास शिरसाट- छत्रपती संभाजीनगर-जालना
- अमर राजूरकर - नांदेड
- बसवराज पाटील - धाराशिव-लातूर-बीड
- नंदकिशोर महाजन - जळगाव
- डॉ. राजीव पोतदार - नागपूर (पोटनिवडणूक)

