- सुनील मेहरोत्रा
मुंबई : मुंबईत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणुकीने जन्म दाखले मिळवण्याच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या मोठ्या रॅकेटचा आणि संबंधित गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी, मुंबई पोलीस आयुक्तांनी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.
मुंबई पालिकेने केलेल्या चौकशीत 87,347बनावट जन्म दाखल्यांच्या नोंदी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी महत्त्वाची माहिती दिली की, मुंबई पोलीस गुन्हे शाखा बनावट कागदपत्रांचा वापर करून दाखले मिळवण्याशी संबंधित गुन्ह्यांचा आधीच तपास करत होती. तपासादरम्यान तसेच विविध तक्रारींमधून असे समोर आले की, मोठ्या संख्येने असे जन्म दाखले फसवणूक आणि बनावटगिरीद्वारे मिळवले गेले होते. या प्रकरणाची व्यापक व्याप्ती आणि संवेदनशीलता लक्षात घेता, या तक्रारींचा सखोल आणि प्रभावीपणे तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे विशेष तपास पथक पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे. या उच्चस्तरीय पथकामध्ये मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा), मुंबई आणि डीसीपी (शोध) यांच्यासह गुन्हे शाखेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एसआयटीच्या स्थापनेमुळे या संपूर्ण नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्यास तसेच या फसवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल, असा पोलिसांना विश्वास आहे.

