मुंबई : म्हाडाच्या पाच फ्लॅटसाठी सुमारे 60 लाखांचा अपहार करून पळून गेलेल्या एका भामट्याला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. जतीन बाबू सोलंकी असे या आरोपी भामट्याचे नाव असून तो अनेकांना मंत्रालयातील महसूल विभागातील कर्मचारी असल्याची बतावणी करून गंडा घालत असल्याचे उघडकीस आले आहे.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 69 वर्षांची तक्रारदार महिला ही मालाड परिसरात राहते. तर नालासोपारा येथे राहणारा आरोपी जतीन हा तिच्या परिचित असून ते एकमेकांना गेल्या 23 वर्षांपासून ओळखतात. त्यामुळे जतीन हा नियमित तक्रारदार महिलेच्या घरी येत होता. सहा वर्षांपूर्वी जतीन अचानक महिलेच्या घरी येणे बंद झाला होता. त्यानंतर तो एप्रिल 2025 मध्ये महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने महिलेला सांगितले की, तो मंत्रालयातील महसूल विभागात कामाला असून त्याच्याकडे म्हाडासंबंधित काम येते. तसेच आरोपी जतीनला पीडित महिलेचे कुर्ला पाईपलाईनमधील तीन झोपड्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती होती. या झोपड्याच्या मोबदल्यात महिलेला तीन फ्लॅट तसेच इतर दोन फ्लॅट स्वस्त:त देतो असे जतीनने सांगितले होते. तसेच पीडित महिलेचा विश्वास बसावा म्हणून जतीनने तिला गोरेगाव येथील डी मार्टसमोरील सिग्मा टॉवर इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील 1501, 1502 आणि 1503 क्रमांकाचे फ्लॅट दाखविले होते.
जतीनवर विश्वास ठेवून पीडित महिलेने त्याला पाच फ्लॅटसाठी 15 लाख कॅशसहीत 47 लाख 47 हजार रुपये बँक ट्रान्स्फर केले होते. अशा प्रकारे पीडित महिलेने पाच फ्लॅटसाठी जतीनला एकूण 60 लाख 47 हजार रुपये दिले. तसेच नोव्हेंबर 2025 रोजी जतीनने पीडित महिलेला फ्लॅटचे अॅलोटमेंट घेण्यासाठी एमएमआरडीए कार्यालयाजवळ बोलाविले होते. मात्र मंत्रालयातील एक महत्त्वाची फाईल चोरीस गेल्याची बतावणी करून तो त्याठिकाणी आलाच नाही. त्यानंतर जतीन विविध कारण सांगून महिलेला टाळण्याचा प्रयत्न करत होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच पीडित महिलेने मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी जतीनविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच दीड महिन्यांपासून फरार असलेल्या जतीनला पोलिसांनी बुधवारी (27 मे) अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मंत्रालयातील महसूल विभागात कामाला असल्याची बतावणी करून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

