- सुनील मेहरात्रा
मुंबई : काही दिवसांपूर्वी पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ माजली होती. बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
पण, आता या प्रकरणाचा तपास करणारे अन्न व औषध प्रशासन (FDA) पथक अडचणीत सापडलेले दिसत आहे. त्या कुटुंबाने जेवणासाठी वापरलेल्या कलिंगडावर संशयाची सुई वळली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा हे पथक तपासासाठी बाजारात पोहोचले, तेव्हा त्यांना एकही कलिंगड विक्रेता दिसला नाही. संपूर्ण बाजारपेठच गायब झाल्यामुळे ही कलिंगड कुठून आले? हे निश्चित करणे जवळजवळ अशक्य झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी संपूर्ण परिसरात शोध घेतला. पण, चौकशीसाठी फक्त एकच विक्रेता सापडला.
एफडीएसाठी हे एक विलक्षण गुंतागुंतीचे प्रकरण बनले आहे. ही दुःखद घटना 27 एप्रिल रोजी घडली. जेव्हा 40 वर्षीय पती 35 वर्षीय पत्नी आणि 16 वर्षीय तसेच 13 वर्षीय मुली यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. असे वृत्त आहे की, मृत्यू होण्याआधी कुटुंबाने बिर्याणी आणि टरबूज खाल्ले होते. संध्याकळी नमुने गोळा करण्यासाठी तपास पथक पोहोचले. पण, ताज्या कलिंगडाचे नमुने मिळण्यात येणारी अडचण तपासात एक मोठा अडथळा ठरली आहे. अन्न विषबाधेच्या कोणत्याही प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी, ज्या ठिकाणाहून कलिंगड खरेदी केले होते, तेथून नमुने गोळा करणे आवश्यक असते.
सध्या तरी एफडीएने हार मानलेली नाही आणि कुटुंबाच्या घरातून एकूण 11 नमुने गोळा केले आहेत. यामध्ये उरलेले कलिंगड, शिजवलेली बिर्याणी, कच्चे चिकन, स्वयंपाकघरातील मसाले, हळद, अर्धवट खाल्लेले खजूर आणि पिण्याच्या पाण्याचा समावेश आहे. या नमुन्यांमध्ये कोणतेही विषारी पदार्थ आहेत का? हे निश्चित करण्यासाठी प्रयोगशाळेला शक्य तितक्या लवकर त्यांची चाचणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कुटुंबाने काही संशयास्पद शोधले होते का? हे निश्चित करण्यासाठी त्यांच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीची बारकाईने तपासणी केली जात आहे. या तपासात मुंबई पोलीस आणि न्यायवैद्यक तज्ज्ञही सहभागी आहेत. जोपर्यंत प्रयोगशाळेचा अहवाल आणि न्यायवैद्यक माहिती समोर येत नाही, तोपर्यंत या मृत्यूचे गूढ कायम राहील. बाजारात मिळणाऱ्या फळांमध्ये काहीतरी घातक भेसळ झाली असावी, या भीतीने परिसरातील लोकही घाबरले आहेत.

