मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तेवर आल्यावर बांगलादेशी, रोहिंगे फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे सूतोवाच करणाऱ्या महापौर रितू तावडे यांनी आतापर्यंत किती बांगलादेशी आणि रोहिंगे सापडले?
तसेच किती जणांवर कारवाई केली? याबाबतची माहिती मुंबईकरांना द्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. त्यांनी फेरीवाला या विषयावर आज (02 जून) मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.
मुंबईतील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी 'मला तरी मुंबईत एकही बांगलादेशी फेरीवाला आढळलेला नाही, असे वक्तव्य करून मित्रपक्ष भाजपला चिमटा काढला होता. या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांनी संजय निरुपम यांनी भाजपला बांगलादेशी फेरीवाल्यांबाबत विचारलेली माहिती म्हणजे भाजपच्या मित्रपक्षाने त्यांना दिलेला घरचा अहेर असल्याचे सांगत त्यांनीही भाजपला टोला लगावला. तसेच, भाजपने फेरीवाल्यांना लोकसभा निवडणुकीप्रसंगी 10 हजार रुपये कर्ज दिले. मात्र, निवडणूक झाली, सत्ता आली आता बांगलादेशी, रोहिंगे यांच्या नावाखाली फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. ज्यांनी मते दिली तुम्हाला त्या हिंदू, मुस्लिम, उत्तर प्रदेशीय, बिहारी असूनही त्यांच्यावर कारवाई केली जाते, निवडणुकीच्या प्रसंगी मते घेतली जातात आणि आता त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचे सांगत किशोरी पेडणेकर यांनी खंत व्यक्त केली.
पाऊस पडल्यावर नालेसफाई कामांची पोलखोल
मुंबईमध्ये नालेसफाईची कामे कागदावरच आहेत. नालेसफाईची कामे नीटपणे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पहिला पाऊस पडल्यावर भाजपच्या नालेसफाई कामांची पोलखोल होणार आहे, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी नालेसफाईच्या विषयावर बोलताना केला. तसेच, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांनी निधी वाटपात भेदभाव केला असल्याचा आरोप देखील किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केला.

