Tuesday, 10 Sep, 5.40 am My महानगर

क्रीडा
नदालचे अधिराज्य!

स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाचा युवा खेळाडू डॅनिल मेदवेदेव्हचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. हे त्याचे कारकिर्दीतील १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद होते. त्यामुळे तो रॉजर फेडररच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या (२०) विक्रमापासून केवळ १ जेतेपद दूर आहे. जवळपास पाच तास चाललेल्या या सामन्याचे नदालने पहिले दोन सेट जिंकले. त्यामुळे तो हा सामना सहजपणे जिंकून अमेरिकन ओपनचे चौथ्यांदा जेतेपद पटकावणार असे वाटत असतानाच मेदवेदेव्हने दमदार पुनरागमन केले. त्याने पुढील दोन सेट जिंकले आणि नदालवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसर्‍या सीडेड नदालने आपला अनुभव पणाला लावत हा सामना ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पाच सेटमध्ये जिंकला.

नदालने या सामन्याची दमदार सुरुवात करत पहिले दोन सेट ७-५ आणि ६-३ असे जिंकले. तिसर्‍या सेटमध्ये नदालने २-२ अशी बरोबरी असताना मेदवेदेव्हची सर्व्हिस मोडली. मात्र, मेदवेदेव्हने हार न मानता नदालची पुढील सर्व्हिस मोडत ३-३ अशी बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा एकदा नदालची सर्व्हिस मोडत मेदवेदेव्हने तिसरा सेट ७-५ असा जिंकला. चौथ्या सेटमध्येही मेदवेदेव्हने आपली सर्व्हिस राखत आणि नदालची सर्व्हिस मोडत हा सेट ६-४ असा जिंकला. त्यामुळे हा सामना पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला.

१९४९ नंतर कोणत्याही खेळाडूने पहिल्या ३ पैकी २ सेट गमावल्यानंतर अमेरिकन ओपनचा अंतिम सामना जिंकलेला नव्हता. तसेच मेदवेदेव्हनेही पाच सेट झालेला एकही सामना जिंकला नव्हता. मात्र, या सामन्याच्या पाचव्या सेटमध्ये मेदवेदेव्हने नदालला अप्रतिम झुंज दिली. या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी होती. त्यानंतर नदालने दोन वेळा मेदवेदेव्हची सर्व्हिस मोडत ५-२ अशी आघाडी मिळवली. परंतु, मेदवेदेव्हला पुन्हा नदालची सर्व्हिस मोडण्यात यश आले. त्यामुळे त्याने नदालची आघाडी ४-५ अशी कमी केली. मात्र, पुढील गेम जिंकत नदालने हा सेट ६-४ असा जिंकला आणि चौथ्यांदा अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळवले. ३३ वर्षीय नदाल हा १९७० नंतर ही स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.

आम्ही लवकरच निवृत्त होऊ -नदाल

राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच आणि अँडी मरे हे चौघे सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम चार टेनिसपटू मानले जातात. या चौघांनी मिळून मागील ५९ पैकी ५४ ग्रँड स्लॅम स्पर्धांचे जेतेपद पटकावले आहे. युवा मेदवेदेव्हने अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत नदालला झुंज दिली. मात्र, अखेर अनुभवी नदालनेच विजय मिळवला. हा सामना सामन्यानंतर नदालला अश्रू अनावर झाले, कारण यापुढे फार असे क्षण येणार नाहीत हे त्याला ठाऊक आहे. याबाबत सामन्यानंतर नदाल म्हणाला, हे जेतेपद पटकावल्यामुळे मी भावुक झालो. आम्ही चौघे गेली १५ वर्षे एकमेकांना टक्कर देत आहोत. यापुढे आम्ही फार काळ खेळू शकू असे मला वाटत नाही. मी ३३ वर्षांचा, नोवाक ३२ वर्षांचा, रॉजर ३८ वर्षांचा आणि मरे ३२ वर्षांचा आहे. त्यामुळे आम्ही निवृत्त होण्याची वेळ जवळ येत आहे. प्रत्येकालाच कधीतरी निवृत्त व्हावे लागते.

- नदालने अंतिम सामन्यात मेदवेदेव्हवर ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ अशी मात केली.

- अमेरिकन ओपन जिंकण्याची ही नदालची चौथी वेळ होती.

- नदालने आतापर्यंत १९ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेचे (१ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, २ वेळा विम्बल्डन, ४ वेळा अमेरिकन ओपन, १२ वेळा फ्रेंच ओपन) जेतेपद पटकावले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top