मुंबईपासून दिल्लीपर्यंत 'ऑपरेशन टायगर'च्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू असताना, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतलेल्या एका निर्णयाने केवळ 'मातोश्री'लाच दिलासा दिला नाही तर, संपूर्ण नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली.
सत्ता, संपत्ती आणि पदाच्या मोहापुढे अनेकांची निष्ठा डळमळीत होत असताना, राजाभाऊ मात्र आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे 'ऑपरेशन टायगर'च्या राजकारणात खरा टायगर कोण, याचे उत्तर महाराष्ट्राला मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. स्वार्थापेक्षा संस्कार मोठे असतात, याची प्रचिती देणारी ही भूमिका ठरली असून, राजाभाऊंचे वडील प्रकाशशेठ वाजे यांनी दिलेल्या मूल्यांचेच हे प्रतिबिंब असल्याची भावना व्यक्त होत आहे. परिणामी, लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या मतदारांचा विश्वास आता आणखी दृढ झाला आहे.
उबाठा गटातील सहा खासदारांनी पक्ष नेतृत्वापासून वेगळी भूमिका घेत दिल्लीत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त बुधवारी समोर आले. या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. या सर्व घडामोडींदरम्यान विविध चर्चांना उधाण आले. काही ठिकाणी या खासदारांना मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याच्या वदंता पसरल्या. शंभर कोटी रुपयांच्या व्यवहारांपासून ते भविष्यातील राजकीय पदांच्या आश्वासनांपर्यंत अनेक प्रकारच्या चर्चांचा बाजार रंगला. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नसले तरी कोणत्याही राजकीय हालचालींमागे काहीतरी मोठी गणिते असतात, हे वास्तव नाकारता येत नाही. याच काळात अनेकांच्या नजरा राजाभाऊ वाजे यांच्याकडे लागल्या होत्या. ६ खासदारांनी वेगळी वाट धरली असताना वाजे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, या सर्व घडामोडींमध्ये राजाभाऊ वाजे यांनी शांतपणे आणि ठामपणे आपल्या भूमिकेवर कायम राहणे पसंत केले. त्यांनी ना कोणते बंडखोर सूर लावले, ना दिल्लीच्या दिशेने धाव घेतली. उलट त्यांनी आपल्या नेतृत्वाशी असलेली बांधिलकी कायम ठेवत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले.
खरेतर, ज्या प्रकारचे आमिष इतर खासदारांना दाखवण्यात आले, त्याच प्रकारच्या ऑफर राजाभाऊ वाजे यांनाही मिळाल्या असाव्यात. राजाभाऊ वाजे यांच्यासारख्या नेत्यासाठीही तो मोठा मोह ठरू शकला असता. चर्चेत असलेली शंभर कोटी रुपये ही काही साधीसुधी रक्कम नाही. सामान्य माणसाच्या तर कल्पनेपलीकडील आणि अंबानी, अदानींसारख्या उद्योगपतींसाठीही महत्त्वाची मानली जाणारी ही रक्कम आहे. अशा परिस्थितीत कोणताही नेता डगमगू शकतो. परंतु, वाजे यांनी तसे न करता आपल्या राजकीय निष्ठेला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे, बंडखोर खासदारांच्या भूमिकेचे समर्थन करताना काही जणांनी मातोश्रीकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचा मुद्दा पुढे केला. नेतृत्वाकडून अपेक्षित सन्मान मिळाला नाही, निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाले नाही, अशा तक्रारी समोर आल्या. मात्र, हा युक्तिवाद राजाभाऊ वाजे यांच्या बाबतीत लागू का झाला नाही? ज्या परिस्थितीत इतर खासदार काम करत होते, त्याच परिस्थितीत राजाभाऊ वाजेही काम करत होते. त्यांच्यासाठी मातोश्रीने कुठे लाल गालीचे अंथरले होते? त्यांनाही राजकारणातील संघर्षाचा सामना करावा लागत आहे. विरोधी पक्षात असल्याने अनेक कामे मंजुर होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. तरीदेखील त्यांनी नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली नाही.
राजाभाऊ वाजे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर त्यांचा साधेपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण मानला जातो. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हा केवळ पक्षाच्या नावावर नव्हता तर, त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेवरही होता. सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क, जमिनीवर राहून केलेले काम आणि साध्या राहणीमानामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर निर्माण झाला होता. त्यामुळेच लोकांनी त्यांना भरभरून मतदान केले. आज त्याच मतदारांना आपल्या खासदाराने राजकीय प्रलोभनांना बळी न पडता निष्ठा कायम ठेवली, याचे समाधान वाटत आहे.
आपल्या नेत्याभोवतीचे विश्वासू चेहरे एकामागून एक दूर जात असल्याची वेदना राजाभाऊ वाजे यांच्या डोळ्यांत दाटून आली. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून असंख्य नाशिककरांच्याही पापण्या नकळत ओल्या झाल्या असतील. आजच्या व्यवहारवादी राजकारणात अश्रू ढाळणारे नेते भरपूर सापडतील पण, सहकाऱ्यांनी साथ सोडल्याचे दुःख मनापासून वाटणारे आणि नात्यांना राजकारणापेक्षा मोठे मानणारे नेते अभावानेच पाहायला मिळतात. म्हणूनच राजाभाऊंच्या डोळ्यांतून ओघळलेले ते अश्रू निष्ठा, विश्वास आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याची साक्ष देणारे ठरले.

