मुंबई : विधान परिषदेच्या 17 रिक्त आणि एका ठिकाणी पोटनिवडणूक अशा एकूण 18 जागांसाठी 18 जून 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 1 जून ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, असे असतानाही महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
एकीकडे महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असताना दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वादाची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीतील दोन प्रमुख नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आण मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या एका बैठकीत वाद झाल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर दोन्ही नेत्यांबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आता या वादाच्या चर्चांना या दोन्ही नेत्यांकडून पूर्णविराम लावण्यात आला आहे. कारण, शुक्रवारी (ता. 29 मे) देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर भुजबळ आणि तटकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर येत हम साथ साथ है, असल्याचे दाखवून दिले.
विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी एकत्र संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या एका बैठकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला. यावर छगन भुजबळ यांनी 'हम साथ साथ है', असे म्हणत वाद झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. यावेळी भुजबळांनी म्हटले की, हम साथ साथ है. आमच्यात काहीही वाद नाही. मात्र, वाद आहे असे पसरवण्याचे काम आपण लोकांनी केले आहे. आमच्यात काहीही वाद झालेला नाही. मात्र, कोणी बोलत असेल आणि त्याला आपण म्हटले की थांब-थांब, थोडं लवकर आवर, असे असते. या पलिकडे काहीही नाही. तुम्ही लोकांनी सांगितले की आमच्यात वाद आहे आणि आता पाहा हम साथ साथ है, असे भुजबळांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत स्पष्टपणे सांगत म्हटले की, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वांनी सर्व जागांबाबत चर्चा केली. विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी महायुती म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी एकमत झाले आहे. भाजप कोणत्या जागांवर लढेल? शिवसेना (शिंदे) कोणत्या जागा लढवेल? राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष कोणत्या जागा लढवेल? याबाबत स्पष्टता उद्या (शनिवार) दुपारपर्यंत येईल. राष्ट्रवादीला किती जागा हव्यात, याबाबत सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी मांडलेली आहे. आम्हाला सर्वांना जाणीव आहे की 1 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता लवकरच अंतिम घोषणा केली जाईल, असे यावेळी तटकरेंकडून सांगण्यात आले.

