Monday, 04 Nov, 2.19 am My महानगर

क्रीडा
न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

मिचेल सँटनरची भेदक गोलंदाजी आणि जिमी निशमच्या अप्रतिम फलंदाजीमुळे न्यूझीलंडने दुसर्‍या टी-२० सामन्यात इंग्लंडवर २१ धावांनी मात केली. या विजयामुळे न्यूझीलंडने ५ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ७ विकेट राखून जिंकला होता.

दुसर्‍या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी आक्रमक सुरुवात केली. परंतु, सॅम करनने मुनरोला ७ धावांवर बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. टीम सायफर्टने काही काळ चांगली फलंदाजी करत १५ चेंडूत १६ धावांची खेळी केली. त्याला साकिब महमूदने बाद केले. ही महमूदची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट होती. एका बाजूने विकेट पडत असताना दुसर्‍या बाजूने गप्टिलने चांगली फलंदाजी सुरू ठेवली. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्यावर त्याला लेगस्पिनर आदिल रशिदने माघारी पाठवले. यानंतर कॉलिन डी ग्रँडहोम (१२ चेंडूत २८ धावा), रॉस टेलर (२४ चेंडूत २८) आणि जिमी निशम (२२ चेंडूत ४२) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ८ बाद १७६ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो (०) आणि जेम्स विन्स (१) झटपट माघारी परतले. त्यामुळे इंग्लंडची २ बाद ३ अशी अवस्था झाली. परंतु, सलामीवीर डाविड मलान आणि कर्णधार मॉर्गनने इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी तिसर्‍या विकेटसाठी ३७ धावांची भागी केली. मात्र, न्यूझीलंडची फिरकी जोडगोळी सँटनर आणि ईश सोधी यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. सँटनरने मॉर्गन (३२), करन (९) आणि क्रिस जॉर्डन (३६) यांना बाद केले. लेगस्पिनर सोधीने मलान (३९) आणि सॅम बिलिंग्स (८) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच कर्णधार टीम साऊथी आणि लॉकी फर्ग्युसनने २-२ बळी घेतले. त्यामुळे इंग्लंडचा डाव १५५ धावांवर आटोपला आणि न्यूझीलंडने हा सामना २१ धावांनी जिंकला.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १७६ (निशम ४२, गप्टिल ४१; जॉर्डन ३/२३) विजयी वि. इंग्लंड : १९.५ षटकांत सर्वबाद १५५ (मलान ३९, जॉर्डन ३६; सँटनर ३/२५, साऊथी २/२५, फर्ग्युसन २/३४, सोधी २/३७).

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top