Wednesday, 27 Jan, 11.40 pm My महानगर

क्रीडा
ODI Rankings : विराट कोहली नंबर वन; रोहित दुसऱ्या स्थानी कायम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान राखले आहे. तसेच बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार, भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर कायम होता. कोहलीने आपले अखेरचे एकदिवसीय सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आणि अखेरच्या दोन सामन्यांत ८९ व ६३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याने अव्वल स्थान राखले असून त्याच्या खात्यात ८७० गुण आहेत. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. त्याने त्याचा अखेरचा एकदिवसीय सामना जानेवारी २०२० मध्ये खेळला होता. मात्र, असे असतानाही त्याने दुसरे स्थान कायम राखले असून त्याचे ८४२ गुण आहेत. फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे.

बुमराह तिसऱ्या स्थानावर

गोलंदाजांच्या यादीत भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर असून त्याचे ७०० गुण आहेत. या यादीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (७२२ गुण) अव्वल स्थानी आणि मुजीब उर रहमान (७०८ गुण) दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशचा फिरकीपटू मेहदी हसनला बढती मिळाली असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे ६९४ गुण आहेत.

शाकिब पहिल्या स्थानावर

अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर आहे. त्याने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने तीन सामन्यांत ६ विकेट घेतानाच एक अर्धशतकही केले होते. अष्टपैलू खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या आणि इंग्लंडचा क्रिस वोक्स तिसऱ्या स्थानावर आहे.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top