Tuesday, 04 May, 8.59 pm My महानगर

ताज्या बातम्या
पंढरपूर पोटनिवडणूक मतमोजणीची तक्रार, नितीन मानेच्या मागणीवर NCP चा खुलासा

पंढरपूर पोटनिवडणूकमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी विजय मिळवला आहे. पंढरपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना धोबीपछाड देत भाजपने विजय मिळवला आहे. पंढरपूरमधली जागा गेल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. परंतु सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे पत्र व्हायरल होत आहे. हे पत्र निवडणूक आयोगाला लिहिण्यात आले असून यामध्ये पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजपवर गंभीर आरोपही यामध्ये करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या पत्राशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचा लीगल सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड आशिष देशमुख यांनी निवेदन जारी करत स्पष्टीकर दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अॅड. नितिन माने नावाच्या व्यक्तीशी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचा काहीही संबंध नाही. त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही वा त्यांनी दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी सेलचा दूरान्वयानेही संबंध नाही, असे सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी जाहीर केले आहे. अॅड. नितीन माने ही व्यक्ती स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची सदस्य असल्याचे भासवत आहे.

या व्यक्तीने तसे लेटरहेड देखील बनवले आहे तसेच या लेटरहेडचा वापर करून, पार्टी लिगल सेलच्या नावाचा गैरवापर करून, खोटी निवेदने व तक्रारी ही व्यक्ती देत आहे. अॅड. नितिन माने यांच्यावर सेलच्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवू नये व पत्रव्यवहार करू नये, असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी जाहीर केले आहे.

काय आहे प्रकरण

पंढरपूर निवडणूक झाल्यावर अॅड नितीन माने नावाच्या व्यक्तीने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहिण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलच्या लेटरहेडचा वापर केला आहे. तसेच आपण लीगल सेलचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. पंढरपूरमध्ये भाजपने कारखान्यातील कामगारांना डांबून ठेवले होते तसेच त्यांना भाजपला मतदान करण्यासाठी धमकावले असल्याचा आरोप केला होता. तसेच पंढरपुरमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी या पत्रात केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top