Dailyhunt
Parth Pawar : पटेल आणि तटकरेंना वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी; पार्थ पवारांकडून तीव्र शब्दांत निषेध

Parth Pawar : पटेल आणि तटकरेंना वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी; पार्थ पवारांकडून तीव्र शब्दांत निषेध

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्याच्या पाहायला मिळाल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाली आणि त्यानंतर त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील निवड करण्यात आली.

मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फुट पडल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. तसेच सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुनेत्रा पवार आज (02 एप्रिल) दिल्ली दौऱ्यावर असताना देखील दोन्ही नेते अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासंदर्भात समोर येणाऱ्या बातम्यांवरून अजित पवार यांचे पुत्रे तथा खासदार पार्थ पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पार्थ पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारे निराधार अहवाल आणि केवळ तर्कवितर्कांवर आधारित कथा म्हणजे निव्वळ कल्पित कथाच आहेत. त्यांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हा सर्वांना आजही मार्गदर्शित करत आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध व्हायलाच हवा, असे म्हणत पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे वाद?

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 25 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी 2026 रोजीनंतर पक्षाने केलेला कुठलाही पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी विनंती केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी आरोप केला होता की, अजितदादांचे निधनानंतर 18व्या दिवशी अर्थात 16 फेब्रुवारीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. त्या पत्रावर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या होत्या. दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगाला म्हटले होते की, आमच्या पक्षाची घटना बदलली आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल आणि नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे (कार्यकारी अध्यक्ष) पक्षाची ताकद असेल, तर ते सर्व निर्णय घेतील. मात्र पक्षाच्या विद्यमान अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना या पत्राची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र लिहिले, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. हे पत्र बुधवारी समोर आले आणि खळबळ उडाली आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होते, तेव्हा निवडणूक आयोगाकडे पक्षाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोण -कोण आहे? आणि त्यांच्या नावाची यादी निवडणूक आयोगाला पाठवावी लागते. त्यानुसार 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत 13 नावांचा उल्लेख केला होता. या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्षा आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर खजिनदार असा होता. मात्र प्रफुल पटेल हे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष आहेत, तर सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असतानाही दोन्ही नेत्यांच्या समोर त्यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर आता सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना दोन्ही नेते अनुपस्थित आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar