Tuesday, 04 May, 4.11 pm My महानगर

देश-विदेश
पश्चिम बंगाल निकालानंतर हिंसा, मोदींकडून राज्यपालांना कायदा, सुव्यवस्थेची विचारपूस करणारा फोन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात हिंसाचाराचे वातावरण आहे. बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात जाळपोळ आणि हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आरोप केले की, त्यांच्यातील अनेक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. मंगळवारी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कायदा, सुव्यवस्थेची विचारपूस करणारा फोन करण्यात आला. यावेळी, पंतप्रधान मोदींनी फोन करून बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता देखील व्यक्त केली.

बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांना टॅग करून असे म्हटले की, 'पंतप्रधान मोदींनी फोन केला आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता आणि नाराजी व्यक्त केली आहे. यासह राज्यात होत असलेल्या हिंसाचार, जाळपोळ, लूटमार आणि खुनाबद्दल देखील पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात सुव्यवस्था राबविण्यासाठी वेगवान प्रयत्न होणे आवश्यक आहे.', असेही त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितले.

सोमवारी ममता बॅनर्जी यांनी जनतेला राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान झालेल्या या हिंसाचारासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. ते म्हणाले की, 'बंगाल शांतताप्रिय आहे. निवडणुकांच्या वेळी काही प्रमाणात वातावरण चांगलेच तापले होते. पश्चिम बंगाल निकालानंतर भाजपासह सीएपीएफनेसुद्धा खूप हिंसाचार केला. मात्र मी लोकांना शांतता प्रस्थापित करण्याचे व हिंसाचारात कोणताही सहभाग न घेण्याचे आवाहन करीत आहे. काही वाद-विवाद असल्यास पोलिसांना त्याची माहिती द्या. कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था पोलीस करतील, असेही ममता बॅनर्जी म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील निकालानंतर हिंसाचाराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या भाजपच्या एका नेत्याने याचिका दाखल केली आहे. गौरव भाटिया यांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, 'बंगालमध्ये महिलांवर बलात्कार करण्यात आला आहे, भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे, त्यामुळे सीबीआयकडे झालेल्या हिंसाचाराची चौकशी झाली पाहिजे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top