मुंबई : पतीच्या अनैतिक संबंधामुळे मानसिक नैराश्यातून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. याप्रकरणी एक महिन्यांनी गुन्हा दाखल करुन आरोपी पती प्रदीप रघुनाथ गायकवाड याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली.
त्याच्यावर त्याची पत्नी मनिषा प्रदीप गायकवाड हिचा अनैतिक संबंधातून मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पती प्रदीप गायकवाड आणि दोन मुलांसोबत मनिषा गोरेगाव येथील दिडोंशीपाडा, कोयनानगर, साईबाबा चाळीत राहत होती. २०१७ मध्ये त्यांचा दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर तो तिचा क्षुल्लक कारणावरुन मानसिक व शारीरिक शोषण करत होता. काही दिवसांपासून प्रदीपचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती समजताच मनिषाने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यावरुन तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्याने तिला धमकावून हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती.
पतीच्या धमकीनंतरही तिने हा प्रकार तिच्या आजीला सांगितला होता. मात्र ती माहिती तिच्या घरच्यांना सांगू नकोस अशी विनंती केली होती. 17 मे 2026 रोजी त्याच्या लग्नाचा नववा वाढदिवस होता. त्या दिवशी त्याने मनिषाशी विनाकारण वाद घालून तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. या छळाला ती प्रचंड कंटाळून गेली होती. त्यातून तिला मानसिक नैराश्य आले होते. त्यामुळे तिने लग्नाच्या वाढदिवसाला रात्री साडेनऊ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर प्रदीपमध्ये काहीच सुधारणा झाली नव्हती. तो मजेत राहत होता. याबाबत मनिषाच्या आई-वडिलांनी चौकशी केल्यानंतर त्यांना स्थानिक रहिवाशांसह तिच्या आजीकडून घडलेला प्रकार समजला.
प्रदीपला त्याच्या प्रेयसीसोबत राहायचे होते, त्यामुळे तो मनिषाचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्याला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिच्या आईने दिडोंशी पोलिसांत प्रदीपविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मनिषाच्या आत्महत्येनंतर एक महिन्यानंतर पोलिसांनी प्रदीपविरुद्ध पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

