Friday, 06 Aug, 3.10 am My महानगर

देश-विदेश
पेगासस हेरगिरीचे याचिकाकर्त्यांकडे पुरावे नाहीत

पेगासस हेरगिरी झाल्याचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? मग चौकशीचे आदेश कोणत्या आधारावर देणार, असा सवाल उपस्थित करताना सुप्रीम कोर्टाने पेगासस हेरगिरीप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने तुमच्याकडे हेरगिरीचे काही पुरावे आहेत का, असा प्रश्न याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना विचारला तेव्हा आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असे त्यांनी सांगितले. पेगासस हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमना आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणी पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

वृत्तपत्राच्या क्लिपिंगशिवाय तुमच्या याचिकेत काय आहे? या प्रकरणी का सुनावणी करावी? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला. यावर याचिकाकर्त्याचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले की, हा तंत्रज्ञानाद्वारे वैयक्तीक गोपनीयतेवर हल्ला आहे. यासाठी फक्त एका फोनची गरज आहे आणि आमच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाऊ शकते. हा राष्ट्रीय इंटरनेट सुरक्षेचाही प्रश्न आहे.

हा गंभीर विषय आहे, कोर्टाला मान्य आहे. पण एडिटर्स गिल्ड सोडून सर्व याचिका या वृत्तपत्रांवर आधारीत आहेत. चौकशेचे आदेश देण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा नाहीए. हे प्रकरण २०१९ मध्येही चर्चेत होते. अचानक मुद्दा तापला. सर्व याचिकाकर्ते उच्च शिक्षित आहेत. यामुळे कोर्ट कुठल्या प्रकरणांची दखल घेते हे आपल्याला माहिती आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. आमच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत हे बरोबर आहे. पण एडिटर्स गिल्डच्या याचिकेत हेरगिरीच्या ३७ प्रकरणांचा उल्लेख आहे, असं सिब्बल म्हणाले. सिब्बल यांनी यावेळी व्हॉट्सअ‍ॅप आणि एनएसओ दरम्यान कॅलिफोर्नियातील कोर्टात सुरू असलेल्या एका प्रकरणाचे उदाहरण दिले. पेगागस हेरगिरी करते हे स्पष्ट आहे. भारतात हेरगिरी केली की नाही? असा प्रश्न असल्याचे सिब्बल म्हणाले.

सर्वांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेची एक कॉपी सरकारला द्यावी. या प्रकरणी सरकारकडून कुणाला तरी कोर्टात हजर होऊ द्या. यानंतर नोटीस जारी करण्याचा विचार केला जाईल. या प्रकरणी आता १० ऑगस्टला मंगळवारी सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top