- संदीप वाकचौरे
पिअर आणि मेरी क्यूरी यांनी किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध लावताना शरीरावर मूलद्रव्याचा परिणाम होऊन त्यांनी मृत्यूला कवटाळले. लोककल्याणाची वाट चालताना स्वत:चे जीवन समर्पित केले.
ही माणसं वैज्ञानिक होती. त्यांच्या संशोधनासाठी त्यांनी पेटंट घ्यावे आणि त्या माध्यमातून अब्जाधीश व्हावे अशी त्यांच्या मित्रांची कल्पना होती. मात्र आपल्या संशोधनाचा लाभ सामान्यांच्या आयुष्यातील वेदना संपुष्टात येण्यासाठी होणार असेल, तर आम्हाला पैसे नकोत, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी केलेले संशोधन अवघ्या मानवजातीच्या कामी आले.
पिअर क्यूरी यांचा 11 एप्रिल हा मृत्यू दिन. नोबेलसारखा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मिळूनही त्यांची जीवनकथा सामान्य माणसांसारखीच राहिली. या व्यक्तीचे जीवन सामान्यांसारखे असले तरी कर्तृत्व मात्र असामान्य होते. अवघ्या जगाच्या कल्याणाकरिता स्वहिताकडे दुर्लक्ष करत या कुटुंबाने आपला जीवन प्रवास मानवी कल्याणासाठी सुरू ठेवला होता. जीवनभर संशोधनाचा आनंद घेत, संशोधनाची वाट चालल्यानंतर संशोधनाचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. अर्थात किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध लावताना पतीपत्नीच्या शरीरावर मूलद्रव्याचा परिणाम होऊन त्यांनी मृत्यूला कवटाळले. लोककल्याणाची वाट चालताना स्वत:चे जीवन समर्पित केले. ही माणसं वैज्ञानिक होती. त्यांच्या संशोधनासाठी त्यांनी पेटंट घ्यावे आणि त्या माध्यमातून अब्जाधीश व्हावे अशी त्यांच्या मित्रांची कल्पना होती. मात्र आपल्या संशोधनाचा लाभ सामान्यांच्या आयुष्याच्या वेदना संपुष्टात येण्यासाठी होणार असेल, तर आम्हाला पैसे नकोत. श्रीमंतीची वाट नाकारत जीवनभर कफल्लक वृत्तीने जीवन जगणार्या संशोधकांचे आयुष्य संतांपेक्षा कमी नव्हते. त्यांनी केलेले संशोधन अवघ्या मानवजातीच्या कामी आले.
कोणतेही संशोधन, ज्ञानाच्या वाटा धर्म, जात, पंथ, राष्ट्र अशा सर्वच मर्यादा ओलांडून मानव कल्याणाची वाट चालत राहते हेच खरे. मात्र चांगुलपणाची वाट चालतानाही त्यांच्या वाट्याला मात्र बदनामीच आली. इतरांच्या आयुष्याला आपल्या संशोधनात्मक ज्ञानाचा उपयोग व्हावा हा उदात्त हेतू ठेऊन ही माणसं समाजासाठी जगली. ज्ञानाच्या आनंदासाठी जीवनभर नावीन्याच्या शोधात चालत राहिली. त्या संशोधनाच्या वाटा चालताना रेडियमच्या शोधासाठी कितीतरी कठीण वाट ते चालत राहिले. आरंभी त्या वाटांचा प्रवास करताना तो जीवघेणा ठरेल असे वाटले नाही. मात्र रेडियमच्या किरणोत्सराचा अत्यंत विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. त्यामुळे प्रकृती ढासळली. सांधे दुखणे अत्यंत तीव्र झाले. शरीर प्रचंड अशक्त झाले. अगदी हाताच्या बोटाने काही पकडावे इतकीदेखील शक्ती अंगी उरली नाही. अशावेळी पॅरिसमधील एका रस्त्यावरून ते चालत होते. नुकताच पाऊस पडून गेला होता. पावसाने रस्ते ओले झाले होते. त्या रस्त्याने जाताना एका ठिकाणी अचानक त्यांचा पाय घसरला आणि रस्त्यावर पडले. ते रस्त्यावर पडले असताना मागून आलेल्या एका वेगवान बग्गीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि एवढ्या मोठ्या वैज्ञानिकाचा मृत्यू झाला. जगप्रसिद्ध असलेल्या एका वैज्ञानिकांचा हा अंत अत्यंत वेदनादायी असाच होता. तो दिवस होता 11 एप्रिल 1906. आता त्यालाही सुमारे 120 वर्षं झाली आहेत.
पिअर क्युरी हे नाव विज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत आदराने आजही घेतले जाते. त्यांची पत्नी मेरी क्युरी यांचे कर्तृत्वदेखील तितकेच मोठे होते. जणू हे जोडपे एकमेकांसाठीच तयार झालेले असावे इतके ते एकरूप होते. मान्या स्वलोडोव्हस्का यांनी भौतिकशास्त्र विषयात पदवी मिळवली होती. त्यांना पुढे भौतिकशास्त्रातच संशोधन करण्याची इच्छा होती. पीएचडीसाठी त्यांची संशोधन करण्याची मनीषा होती, पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. अशा परिस्थितीत मागे न हटता, त्यांनी पीएचडी संशोधनाची वाट चालणे पसंत केले. अशा परिस्थितीत संशोधनासाठी त्यांना प्रयोगशाळेची गरज होती. त्यांनी प्रयोगशाळेचा शोध सुरू केला. संशोधनासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेची अडचण परिचित असलेल्या पोलिश वैज्ञानिकाला सांगितली. संशोधनाची रूची पाहून त्यांनी मान्या यांना मदतीचा हात देऊ केला. त्यांनी मान्या यांचा परिचय पियर क्यूरी यांच्याशी करून दिला. त्यांना संशोधनासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी पियर क्यूरी हे पॅरिसमधील एका नामवंत प्रयोगशाळेच्या प्रमुखपदी होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच प्रयोगशाळेत असलेल्या अडगळीच्या एका खोलीत प्रयोग करण्याची अनुमती दिली. अर्थात ती चक्क अडगळीची खोली होती. आपल्याला अडगळीची खोली दिली, तरी त्यांनी स्वीकार केला. शेवटी काहीच मिळत नव्हते, पण या निमित्ताने किमान संशोधनाची वाट तरी सुरू होणार होती. अशाही परिस्थितीत मान्या खूश होत्या. या ठिकाणी इतर वैज्ञानिकदेखील आपापले संशोधन करत होते.
मान्या आणि पियर एकाच परिसरात प्रयोग करत असल्यामुळे दोघांचे अधून-मधून भेटणे व्हायचे. त्या भेटी वारंवार होऊ लागल्यावर परिचय दृढ झाला. त्यातून दोघांचे प्रेमाचे नाते जुळले आणि पुढे ते विवाह बंधनात अडकले. अर्थात हा विवाह अत्यंत साधेपणाने केला गेला. विवाहामध्ये मिळालेल्या पैशातून त्यांनी दोन सायकली विकत घेतल्या. पुढे या दोघांनी दक्षिण फ्रान्सच्या प्रवासदेखील केला. त्या दरम्यान पीएचडीसाठी त्यांनी नवाच विषय निवडला होता. युरिनियममधून बाहेर पडणार्या अदृश्य किरणाचे गुणधर्म पडताळावेत आणि निसर्गातील शक्तीचा शोध घ्यावा, असे त्यांना वाटत होते. त्यादिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी पिचब्लेड खनिजाचा उपयोग केला. या खनिजातून आणखी एका मूलद्रव्याचा शोध लागला आणि त्याचे नाव होते रेडियम. काही टन खनिजातून एखादा ग्रॅम रेडियम मिळत असे. प्रयोग करणे किती संयमाचे काम असते हे त्यांच्या या प्रयोगावरून सहजतेने लक्षात येईल. ते मिळवण्यासाठी त्यांनी आपल्याजवळ असलेले सर्व पैसे एकत्रित केले. पिचब्लेड खनिज खरेदी केले. त्यांनी सलग पाच वर्ष हे खनिज उकळून एक दशांश ग्रॅम रेडियम वेगळे केले. हे काम अत्यंत जिकरीचे होते, पण ध्येयासाठी त्यांनी ती वाट चालणे पसंत केले. हे सारे प्रयोग करत असताना या कालावधीत मेरीचे 15 पौंड वजन कमी झाले. या संशोधनाचे प्रयोग सुरू असताना त्यांनी तीसपेक्षा अधिक शोधनिबंध सादर केले. या संशोधनाच्या आधारे मेरी यांना पीएचडी पदवी मिळाली. त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. त्यांनी सुरू ठेवलेल्या या संशोधनाकडे जगाचे लक्ष लागून होते. 1903 मध्ये त्यांनी केलेल्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर पिअरला अकॅडमी ऑफ सायन्स या फ्रान्समधल्या प्रतिष्ठित संस्थेचे सभासदत्व मिळाले. पण मेरी क्यूरीला मात्र केवळ स्त्री असल्या कारणाने सभासदत्व नाकारले गेले. अर्थात शंभर सव्वासे वर्षांपूर्वीची ही अवस्था होती. आज अनेक ठिकाणी महिलांना जगण्याचे स्वातंत्र्य नाकारले जात आहे. पुरुषाने कितीही चुका केल्या तरी स्त्रीला जबाबदार धरण्याची परंपरा आहे.
भोंदूबाबा अशोक खरातने नालायकपणा केल्यानंतर पुन्हा त्याच स्त्रीयांविषयी बोलले जाते आहे. महिलांविषयी दृष्टिकोन आपल्याकडे वर्तमानातदेखील तसाच आहे. अर्थात पाश्चात्य देशात तेव्हाही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत नकारात्मक होता. पिअरच्या मृत्यूनंतर मेरी पॉल लाँगेव्हिने या पीएचडीच्या मार्गदर्शकाच्या प्रेमात पडली. त्यांचे प्रेमप्रकरण फ्रान्समधील वर्तमानपत्रात गाजले होते. अर्थात त्यांच्यावर प्रचंड टीकादेखील झाली. खरंतर पिअरच्या मृत्यूनंतर मेरीने त्यांच्या जागेवर प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवली होती. तेथे अध्यापनाचे कामही सुरू केले होते. मेरी ही फ्रान्समधील पहिली महिला प्राध्यापक ठरली होती. त्या दरम्यान 1911 ला रसायनशास्त्रातील किरणोत्सारी मूलद्रव्यासाठीचे दुसरे नोबेल मेरीला जाहीर झाले होते. हा तिच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस होता, मात्र पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुरस्कार देणार्या संयोजकांना मेरीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी मेरीला पत्र लिहिले की, आपण स्टॉकहोमला नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ नये. याचे कारण होते की, स्वीडनच्या राजाला हा पुरस्कार तुम्हाला प्रदान करताना अडचणीचे ठरेल. हे काही सयुक्तिक कारण नव्हते. मात्र तरी हे कारण देऊन त्यांनी मेरीच्या कर्तृत्त्वाकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला होता. हे पत्र हाती पडल्यानंतर मेरीने समितीला कळवले की, आपण मला जो नोबेल जाहीर केला आहे, ते माझ्या विज्ञानात केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठीचा आहे. व्यक्तिगत जीवनातील माझ्या ज्या घटना आहेत, त्याच्याशी या पुरस्काराचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टॉकहोमला मी येणार आहे. अर्थात मेरी पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेली आणि पुरस्कार स्वीकारून परतदेखील आली. तिच्याकडे युरोपातील समाज स्वैराचारी महिला म्हणूनच पाहत होता. मुळात महिलांच्या कर्तृत्त्वाकडे दुर्लक्ष करत त्यांना स्वैराचारी ठरवले की, पुरुषी अहंकार पोसणे सुलभ होते. तेव्हाच ते घडत होते असे नाही, आजही आपल्याकडे तसेच घडताना दिसत आहे.
मेरीला पुरस्कार मिळाल्यानंतर अमेरिकेमध्ये सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. अर्थात सत्काराला जाणार्यांपैकी त्या नव्हत्या. पण त्या सत्काराला एक ग्रॅम रेडियम दिले जाणार होते. आपल्याला पुढील संशोधनासाठी ते उपयोगी पडेल, म्हणून त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला होता. संशोधन, ज्ञानावरील ही निष्ठा होती. अमेरिकन राष्ट्राध्यंक्षाच्या हस्ते त्यांचा सन्मान केला गेला. अर्थात मेरीच्या प्रकृतीच्या वाट्यालाही संशोधनाचा परिणाम आला. किरणोत्सारी मूलद्रव्याचा परिणाम म्हणून मेरीच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्यांना ल्युकेमिया झाला आणि त्याच आजाराने तिचा मृत्यू झाला. केवळ संशोधनाची वाट चालत असताना, त्याचा परिणाम स्वत:च्या शरीरावर झाला आणि त्यात हे दोघेही पतीपत्नी मृत्यू पावले. ज्ञानावरील निष्ठा यापेक्षा वेगळी असण्याची शक्यता नाही. अशी माणसं आणि त्यांचे जीवन मानवी कल्याणासाठी होते, हा विचार लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

