मुंबई : महाराष्ट्र पोलीस भरतीची परीक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यातील अनेक तरुण वर्षभर प्रयत्न करून या परीक्षेची तयारी करतात. पण, अशा मेहनती मुलांच्या स्वप्नावर गदा आणली जात असल्याची तक्रार आता केली जात आहे.
याचे कारण, नुकताच एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये एसआरपीएफ गट 5 येथील पोलीस भरती परीक्षेत चक्क एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला पुन्हा गालबोट लागल्याचे समोर आले आहे. शनिवारी (2 मे) एसआरपीएस गटाची 100 गुणांची लेखी परीक्षा पार पडली. ही परीक्षा इंदापुरातील एका महाविद्यालयात झाली. प्रत्येक प्रश्नाला एक गुण होता, असे एकूण 100 प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. त्याच शंभर प्रश्नांची क्रमवारी मागे-पुढे करून ए, बी, सी आणि डी असे प्रश्नसंच पुरविण्यात आले होते. या परीक्षेतील चारही प्रश्नपत्रिकेत 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून उचलण्यात आले होते. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हटले आहे की, "राज्य राखीव पोलीस दलाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करत असतात. आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. पण, जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला? याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी," अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

