Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Prajakt Tanpure : शरद पवारांना धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या हाती कमळ; प्रवेशानंतर काय म्हणाले?

Prajakt Tanpure : शरद पवारांना धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या हाती कमळ; प्रवेशानंतर काय म्हणाले?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला शनिवारी (30 मे) मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश घेत कमळ हाती घेतले आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.

आगामी विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्राजक्त तनुपरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते यावेळी म्हणाले की, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडेन. दरम्यान, अहिल्यानगरमध्ये हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

"माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला. जमलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य बघता सर्वांच्या इच्छेचा आदर करून आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे." असे म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "विरोधी पक्षात असतानाही मी माझी भूमिका पार पडली. पण, त्याची मोठी किंमत माझ्या मतदारसंघाला चुकवावी लागली. सत्ता गेल्यानंतर विकासकामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना होती की विकास झाला पाहिजे. माझ्यामागे कोणतीही चौकशी वगरे लावण्यात आलेली नाही. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून मी हा निर्णय घेतला आहे." असे म्हणत त्यांनी पक्षप्रवेश करण्यामागचे कारण सांगितले.

जयंत पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले?

अनेकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होते. याबाबत त्यांचे भाच्चे असलेले प्राजक्त तनपुरे म्हणाले की, " माझ्या प्रवेशाचा आणि जयंत पाटील यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबध नाही. आम्ही जरी मामा - भाचे असलो तरीही दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय समीकरणे ही वेगवेगळी आहेत. त्यांची राजकीय उंची, राजकीय अनुभव खूप मोठा आहे. त्यामुळे, माझ्या प्रवेशाचा आणि त्यांच्या पुढील राजकीय दिशेशी कोणताही संबध नाही." असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

कोण आहेत प्राजक्त तनपुरे?

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते होते. त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले होते. प्राजक्त तनपुरे यांना पहिल्यांदा आमदार होताच मंत्रिपद मिळाले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीतून प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे ते पुत्र आहेत. तर जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे 20 वर्षे आमदार होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar