प्रीतिलता वड्डेदार या भारतीय महिला क्रांतिकारक होत्या. त्यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील चित्तगांव या गावी ५ मे १९११ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जगबंधू वड्डेदार व आईचे नाव प्रतिभा वड्डेदार होते.
दुर्गा, इतिहासातील जिजाबाई, राणी पद्मिनी, राणी चेन्नमा, राणी लक्ष्मीबाई इत्यादी वीरांगनांच्या गोष्टी ऐकून प्रीतिलता प्रेरित झाल्या होत्या. त्यांच्या मनात आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी भावना लहानपणापासूनच निर्माण झाली होती. इ.स. 1927 मध्ये त्या विषेश प्रावीण्य प्राप्त करून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी कल्पना दत्त, कमला मुखर्जी, रेणू रे या मैत्रिणींसह हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारले. इ.स. 1930 साली त्या बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
ढोलघाटला परत आल्यावर प्रीतिलतांनी 'नंदनकानन' शाळेची मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला. पुढे हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमधील त्यांचे सहकारी सूर्यसेन यांनी त्यांच्यावर इंग्रज अधिकार्यांच्या क्लबवर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली. 4 सप्टेंबर 1932 ला रात्री 9.30 वाजता प्रीतिलता आणि इतर सात सहकार्यांनी पहाडतळी रेल्वे स्टेशनजवळील क्लबमध्ये एकत्रित झालेल्या इंग्रज अधिकार्यांवर हल्ला केला. त्यांनी 15 अधिकार्यांना ठार केले आणि त्या क्लबच्या इमारतीवर बॉम्ब टाकून तेथील शस्त्रसाठा उद्ध्वस्त केला. स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेणार्या पुरुषी वेशातील प्रीतिलताने त्यानंतर स्वतः सायनाईड प्राशन करून आत्मबलिदान केले. तो दिवस 23 सप्टेंबर 1932 हा होता.

