Dailyhunt
Pune Rain : पुण्यात आजही पावसाचा धुमाकूळ, वादळी वारा अन् ढगांचा गडगडाट; रस्त्यावर साचले पाणी

Pune Rain : पुण्यात आजही पावसाचा धुमाकूळ, वादळी वारा अन् ढगांचा गडगडाट; रस्त्यावर साचले पाणी

पुणे : हवामान विभागाने राज्यात 30 मार्चपासून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविला होता. तसेच 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाजही वर्तविण्यात आला होता.

त्यानुसार पुण्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. पुणे शहरासह उपनगरात आज (02 एप्रिल) दुपारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून पावसाचे वातावरण असल्यामुळे पुणेकराना आता पावसाळा सुरू झाल्यासारखे वाटू लागले आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी आकाश दिवसभर ढगाळ होते, पण पावसाने विश्रांती घेतली होती. तसेच बुधवारी देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. मात्र दुपारनंतर तीनच्या सुमारास वारा सुटला आणि उपनगरांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर आज दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता. मात्र अचानक दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. कात्रज-सातारा रस्त्यावर गारा पडत असताना कोथरूड, कर्वेनगर-कर्वे रस्त्यावर ऊन पडले होते. मात्र तासाभरानंतर तिथेही पावसाला सुरुवात झाली. तर डेक्कन-शिवाजीनगर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा वाढला होता. काल रात्री साडेआठपर्यंत शहरात 0.4 मिलिमीटर, तर लोहगावमध्ये 32.6 मिलिमीटर पाऊस पडला. त्यानंतर आज पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी पावसात भिजण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला आणि आडोशामध्ये थांबणे पसंत केले. मात्र या हंगामात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा गारांसह पावसाची नोंद झाली, हे विशेष.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला आज यलो अलर्ट दिला आहे. आज अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात भर दुपारी अंधार दाटल्याचे पाहायला मिळाले. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव आणि खराडी भागात गारांसह पाऊस पडला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. दररोज दुपारपर्यंत पुण्यातील वातावरण गरम असते, मात्र त्यानंतर अचानक पावसाला सुरुवात होते. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळतो. मात्र अचानक येत असलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडताना दिसते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar