Dailyhunt
Raghav Chadha : मला बोलायचे नव्हते, पण.; आपच्या आरोपांवर राघव चड्ढांचा पलटवार

Raghav Chadha : मला बोलायचे नव्हते, पण.; आपच्या आरोपांवर राघव चड्ढांचा पलटवार

वी दिल्ली : देशातील राजकारणात विविध मुद्द्यांविषयी, विविध नेतेमंडळींविषयी, विविध राजकीय गणितांविषयी चर्चा तर होतच असते. कोणतेही नेते एकत्र आले की, त्यांचे फोटो व्हायरल होतात किंवा कोणत्या नेत्याने आपल्या पक्षाविरोधातच एखादे विधान केले किंवा त्याच्याच पक्षाला आरसा दाखवला तर त्याची जोरदार चर्चा रंगते.

असेच काहीसे आता सध्या आम आदमी पक्षात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पक्षातील राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांची देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार राघव चड्ढा यांनी सामान्य माणसाला भेडसावत असणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडली. मात्र, अचानकपणे त्यांच्या पक्षाकडून त्यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरुन त्यांना दूर करण्यात आले आणि त्यांना राज्यसभेत बोलण्यासही मनाई करण्यात आली.

आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवर केंद्राचे लक्ष वेधले. महिलांच्या समस्या, सामान्य नागरिकांच्या समस्या व अन्य महत्त्वाच्या विषयांना त्यांनी संसदेत वाचा फोडली. परंतु, कदाचित त्यांच्या पक्षाला त्यांचे हेच बोलणे पटले नाही आणि पक्षाकडून त्यांच्यावर राज्यसभेतील उपनेतेपदावरुन दूर करण्याची कारवाई करण्यात आली. ज्यानंतर राघव चड्ढा विरुद्ध त्यांचाच पक्ष म्हणजे आम आदमी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. परंतु, आप इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहिलं. आपसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळेतून राघव चड्ढा यांना बोलू दिलं जाऊ नये, अशी विनंती सचिवालयाला केली. तसेच, पक्षाचे नेते अनुराग ढांडा यांनी तर "राघव… तू काही मागील वर्षांपासून घाबरलेला आहे.. मोदींविरूद्ध बोलायला तुला भीती वाटते.." असा आरोप केला. मात्र, या आरोपांना आता राघव चड्ढा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून "मला बोलायचे नव्हते, पण…" म्हणत उत्तर दिले आहे.

राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या पक्षाने केलेल्या आरोपाचे खंडन करणारा आणि या आरोपांना प्रत्युत्तर देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "मला बोलायचे नव्हते, मात्र गप्प राहिलो असतो तर वारंवार हे खोटे बोलले गेले असते आणि खोटंही खरं वाटलं असतं. तीन आरोप, शून्य सत्य आणि त्यावर माझे उत्तर" असे त्यांनी म्हटले आहे. आपने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राघव चड्ढा म्हणाले की, कालपासून माझ्याविरोधात एक मोहीम राबवली जात आहे. ज्यामध्ये एकसारखीच भाषा, एकसारखेच आरोप, एकसारख्याच गोष्टी आहेत. हा काही योगायोग नाहीये तर एकत्रित मिळून माझ्यावj करण्यात आलेला शाब्दिक हल्ला आहे. पहिल्यांदा मी विचार केला की उत्तर द्यायला नको. मात्र नंतर वाटले की एका खोट्याला हजारवेळा बोलल्यानंतर काही लोकांना ते खरं वाटायला नको आणि म्हणून मी म्हंटल की उत्तर देऊ, असे चड्ढा यांनी म्हटले आहे.

पहिल्या आरोपाला उत्तर….

आम आदमी पक्षाने माझ्यावर तीन आरोप लावत म्हटले की, या तीन आरोपांमुळे आम्ही राघव चड्ढाला संसदेत बोलण्याची परवानगी नाकारत आहोत. राघव चड्ढाच्या संसदेतील बोलण्यावर बंदी या तीन आरोपांमुळे आणण्यात आली आहे. त्यामुळे मी एकेक करून या तिन्ही आरोपांवर आता बोलणार आहे, असे म्हणत चड्ढा यांनी आपला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी पहिल्या आरोपावर उत्तर देताना म्हटले की, जेव्हा विरोधक संसदेत सभात्याग करतात, तेव्हा मी तिथेच बसून असतो. ते सभात्याग करत नाही. मात्र, हे पूर्णतः खोटं आहे. मी आव्हान देतो की, एक दिवस किंवा एखादी घटना असा सांगा, जेव्हा विरोधकांनी सभात्याग केला असेल आणि मी त्यांना पाठिंबा दिला नसेल. संसदेत तर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तुम्ही ते पाहा, म्हणजे सर्व सत्य बाहेर येईल.

दुसऱ्या आरोपाला उत्तर…

दुसरा आरोप केला की, मी केंद्रीय निवडणूक आयोगाला हटवण्यासंदर्भातील जी याचिका होती, त्यावर सही करण्यास नकार दिला. हा दुसरा सर्वात खोटा आरोप आहे. कारण, मला आपच्या कोणत्याही नेत्याने या याचिकेवर औपचारिक किंवा अनौपचारिक कोणत्याही पद्धतीने या याचिकेवर सही करण्यास सांगितले नाही. आपचे राज्यसभेत एकूण 10 खासदार आहेत. ज्यातील सहा की सात खासदारांनी स्वतःच या याचिकेवर सही केलेली नाही. त्यामुळे यामध्ये माझी काय चूक. सर्व आरोप माझ्यावरच का करत आहेत? आणि याचिकेवर राज्यसभेतून एकूण 50 सही हव्या असतात. म्हणजे 105 विरोधी खासदारांमधून केवळ 50 सह्या झाल्या की ही याचिका पूर्ण होते. मग याविरोधात इतका आवाज का? असा प्रश्न राघव चड्ढा यांनी उपस्थित केला.

तिसऱ्या आरोपाला उत्तर…

तिसऱ्या आरोपाला उत्तर देताना खासदार राघव चड्ढा म्हणाले की, मी घाबरलो आहे, असा तिसरा आरोप माझ्यावर करण्यात आला. त्यामुळे मी बेकार मुद्द्यांवर बोलतोय. मात्र पहिली गोष्ट अशी की, मी सांगू इच्छितो की, मी संसदेत ओरडण्यासाठी, शिवीगाळ करण्यासाठी, माइक तोडण्यासाठी गेलेलो नाहीये. मी त्या ठिकाणी लोकांचे मुद्दे उचलण्यास गेलेलो आहे, लोकांची प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गेलेलो आहे आणि मी कोणता मुद्दा उपस्थित केला नाही? मी जीएसटीपासून ते इन्कम टॅक्सपर्यंतच्या मुद्द्यांवर बोललो. पंजाबच्या पाण्यापासून दिल्लीच्या हवेपर्यंतचा मुद्दा उपस्थित केला. आपल्या शासकीय शाळांच्या दुरावस्थेपासून कशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत केले पाहिजे हे सांगितले. भारतीय रेल्वेमधून जे लोक प्रवास करतात, त्यांच्या समस्या सांगितल्या. महिलांची मासिक पाळी ज्याबाबत लोक आजही बोलत नाहीत, तो विषय सुद्धा मांडला. बेरोजगारीपासून महागाईपर्यंत सर्वच मुद्दे मी संसदेत मांडले. हवे तर तुम्ही गेल्या 4 वर्षातील माझा रेकॉर्ड पाहा. महत्त्वाचे म्हणजे मी संसदेत प्रभाव पाडायला गेलो आहे, भांडण करायला नाही, असा टोलाच राघव चड्ढांनी आपल्या पक्षातील नेत्यांना लगावला आहे.

तसेच, ज्या सामान्य नागरिकांच्या करातून हे संसद चालवले जाते, त्या करदात्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी संसदेत गेलो आहे. शेवटी मी इतकंच सांगेन की जे लोक माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, त्यांचे प्रत्येक खोटं मी खोडून काढेल आणि प्रत्येक प्रश्नाचे आता उत्तर दिले जाणार आहे. कारण, मी जखमी आहे आणि त्यासाठीच मी घातक आहे, असा पलटवार खासदार राघव चड्ढा यांनी केला आहे. त्यांच्या या उत्तराला आता आपच्या नेत्यांकडून काय उत्तर देण्यात येते आणि चड्ढा आपला राम..राम…करतात का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar