पुणे : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज गुरुवारी (ता. 30 एप्रिल) पुण्यात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी ते मराठी विषयी भरभरून बोलले. परंतु, यावेळी त्यांनी काही बाबतीत खंत व्यक्त करत महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तीमत्त्वांची नावे घेत त्यांना कोणते पुरस्कार मिळायला हवे होते? यावरही आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी बाहेरचे लोंढे महाराष्ट्रात का येतात? याचे कारण सांगत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचे उदाहरण दिले. देशाच्या राजधानीत महिला असुरक्षित असतील तर काय म्हणणार? असा सवालही यावेळी त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुण्यातील व्याख्यानमालेत भाषण करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, माझी काही महत्त्वाची किंवा मोजकी भाषणे आहेत. शिवतीर्थावरचे असेल, एस.पी. महाविद्यालयातले असेल हे तुम्ही माझ्या घरातल्यांना विचारु शकता, माझ्या हातापायांना घाम फुटलेला असतो. अनेकजण म्हणतील की काहीतरी बोलता, पण मी हे खरं सांगतो. मी अनेकदा अशा भाषणांच्या दिवशी मी कोणाशी बोलतही नाही. का? तर मी भाषण करणारा माणूस आहे. व्याख्यानात एका विषयावर संबंधित तुम्हाला बोलायचे असतं. व्याख्यान ही गोष्ट लिहून काढली तर त्याला निबंध म्हणता येईल. आज मला दिलेला जो विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, असे राज ठाकरे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.
यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंसोबतचा एक संवाद सांगत शिवचरित्राची आठवण करून दिली. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे तुम्ही कुठलेही क्षेत्र घ्या, त्यात तुम्हाला अद्भूत पराक्रम गाजवलेली माणसे मिळतील. भारताच्या इतर राज्यांमध्ये अशी माणसे सापडणार नाहीत, असे यावेळी राज ठाकरेंकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत योजनेचा खरा सिंबॉल हे आमचे गाडगेबाबा हवे होते, अशी भावना व्यक्त करत म्हटले की, कधीतरी आपल्या पुस्तकांमध्ये डोकवा. संतांनी आपल्याला काय दिले आहे तु्म्हाला समजेल. बाहेरच्या राज्यांमधले लोंढे महाराष्ट्रात येतात कारण जे वातावरण इथे आहे ते भारतातल्या कुठल्याही इतर राज्यांमध्ये नाही. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी मुली, महिला कुठल्याही वेळी बसने फिरत असतात. महाराष्ट्रातला मराठी माणूस त्यांची छेड काढणार नाही किंवा त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले.
तसेच, अनेक महिला, मुली, अनेक मुले त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रात येतात. दिल्लीच्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही असे मुली सांगतात. संध्याकाळी 7 नंतर दिल्लीत फिरायला भीती वाटते हे मुली सांगतात. देशाच्या राजधानीत महिला असुरक्षित असतील तर काय म्हणणार? आज हरभजन सिंगपासून सगळे लोक मुंबईत येऊन स्थायिक झाले, अनेक लोक पुण्यात स्थायिक झाले. का? कारण इथल्या इतके सुरक्षित वातावरण कुठे नाही. आपल्याकडे हा मोकळेपणा आला कारण तो महाराष्ट्राचा स्थायीभाव आहे. संतांनी जो महाराष्ट्र घडवला त्यातून आपण हे सगळं पाहतो आहोत, असे यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातील व्याख्यानमालेत म्हटले.

