पुणे : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज गुरुवारी (ता. 30 एप्रिल) पुण्यात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी ते मराठी विषयी भरभरून बोलले. परंतु, यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या सक्तीवरून राज्य सरकारला फटकारले. तसेच त्यांनी महिला सुरक्षितता आदी मुद्द्यांवरून राजकारणी मंडळींना खडेबोलही सुनावले. आमच्याकडे कवी कोण, लेखक कोण हे जातीतून बघितला जाते. मराठीवरून तुम्ही एकत्रित येऊ नये, असा बंदोबस्त केला जात आहे, असे सांगतानाच, महाराष्ट्राचे जे वाटोळे झाले आहे, असे म्हणत परखड भाष्य केले.
महाराष्ट्रात सध्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 राज्यात जे परप्रांतीय किंवा इतर भाषिक रिक्षा, टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करत आहेत, त्यांना मराठी भाषा येणे अनिवार्य आहे, असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आणि यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. त्यांच्या या निर्णयाविरोधात अनेक संघटनांनी आवाज उठवला. त्यामुळे आता इतर भाषिक चालकांना 15 ऑगस्टपर्यंतची मूदत देण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी पुण्यात केलेल्या भाषणातून मंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव न घेता त्यांच्याकडे मराठी शिकण्याला विरोध करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची हिंमत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.
पुण्यातील भाषणात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही सद्यपरिस्थिती तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. आज हा कोणावर तरी राजकारणावर बोलणार आहे, तर ते येतेच त्यामध्ये. परंतु, हे सर्व वाटोळे झाले आहे, त्या सर्व वाटोळ्याला महाराष्ट्रातील राजकारणी जबाबदार आहे. दुसरे कोणी नाही. नाही तर कोणाचीच हिंमत होणार नाही. आज महाराष्ट्रात जो रिक्षा चालकांनी मराठी बोलण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामध्या आम्ही मराठी बोलणार नाही, असे म्हणण्याची हिंमत कशी होते? तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला येऊन सांगतात की आम्ही नाही मराठी बोलणार. ज्यावर आमचे मंत्री मंत्री बोलतात की बरं बरं ठीक आहे, चार महिने अजून घ्या आणि मराठी शिका. परंतु, तुमची लायसन्स रद्द करण्याची हिंमत नाही का? असे सवाल राज ठाकरेंनी विचारला.
तसेच, बाकीच्या राज्यात काय होईल जरा तुम्ही सांगा. पंजाबमध्ये पंजाबी बोलत नाही सांगितले तर काय होईल? मराठी टिकवायची असेल तर वरपासून खालपर्यंत टिकवावी लागते. महाराष्ट्राचा ठसा आपल्या संतांनी, विचारवंतांनी आणि महापुरुषांनी उमटवला आहे ना, मग त्याचा विसर का पडतोय? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. त्यामुळे आता सत्ताधारी नेतेमंडळी काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

