Thursday, 16 Sep, 6.10 pm My महानगर

महाराष्ट्र
राजकीय बेरोजगारीमुळे चंद्रकांतदादांनी कुडमुड्या ज्योतिष्याचा धंदा सुरू केलाय; सचिन सावंतांची टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं वक्तव्य केलं. यावरुन आता महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या राजकीय बेरोजगारीत चंद्रकांत पाटील यांनी कुडमुड्या ज्योतिषाचा धंदा सुरु केला आहे, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला.

देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांना जाहीर कार्यक्रमात एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं वक्तव्य केलं. यामुळे चंद्रकांत पाटील यांना नेमकं काय सूचित करायचं आहे, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, यावरुन सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं.

"मविआने आणलेल्या राजकीय बेरोजगारीत चंद्रकांत पाटील यांनी कुडमुड्या ज्योतिष्याचा धंदा सुरू केला आहे. नवनवीन चिठ्ठ्या टाकल्याने उत्साह टिकून राहतो. मविआ सरकार मजबूत असल्याने दादांचे राजकीय भविष्य अंधारात आहेच पण सगळ्या भविष्यवाण्या खोट्या ठरत असल्याने या धंद्यातही अंधारच दिसतो," असं सचिन सावंत म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top