Sunday, 24 Jan, 2.10 pm My महानगर

महामुंबई
राज्यात आता कोरोना लसीकरण चार दिवसांऐवजी पाच दिवस

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात २९० केंद्रावर २४ हजार २८२ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात शनिवारी सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण पार पडले. यानंतर गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याची माहीती मिळतेय. राज्यात लसीकरण चार दिवसांऐवजी आता सोमवारपासून पाच दिवस सुरू ठेवण्यासह लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे. त्यामुळे लसीकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या आरोग्य खात्याला याबाबतचे निर्देश दिले आहेत. राज्यात 'को विन' अॅपमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने लसीकरणाला अडथळे येत असल्याने खासगी रुग्णालयातील केंद्रे बंद पडले, त्यामुळे लाभार्थ्यांना कोरोनाची लस कधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. त्यानंतर केंद्राच्या 'आयटी टीम'ने 'को विन अॅप'मध्ये दुरुस्ती केल्याने आता राज्यातील सरकारी; तसेच खासगी रुग्णालयात अॅप सुरू होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

काही ठिकाणी 'को विन' अॅप बंद असलेली केंद्रे आता पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने राज्यात येत्या सोमवारपासून आठवड्यातून चारऐवजी पाच दिवस लसीकरण होणार आहे. सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या पाच दिवसांत लसीकरण सुरू राहील; शिवाय मंगळवारी नियमित लसीकरणाचा दिवस; तसेच रविवारी सुट्टी असल्याने दोन दिवस लसीकरणास सुट्टी राहणार आहे.

देशातील ३० कोटी लोकांना लस देण्याचे नियोजन

येत्या ३० जूनपर्यंत देशातील ३० कोटी जनतेला कोरोना लसीकरण करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. यासह राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्र्याने आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top