Friday, 26 Feb, 2.10 am My महानगर

महामुंबई
राज्यातील शाळा १ मार्चपासून बंद

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शाळा 1 मार्चपासून बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या. प्रथम नववी ते बारावीचे वर्ग त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग योग्य ती काळजी घेत व नियमांचे पालन करत सुरू करण्यात आले. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी 1 मार्चपासून जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार आवश्यकता भासल्यास शाळा बंद करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी राज्यातील स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात. तसेच ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे, तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबतही त्यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

वाशिम जिल्ह्यातील देगांव परिसरातील एका आदिवासी शाळेत तब्बल 229 विद्यार्थ्यांना आणि चार कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्याण मंत्री व आदिवासी मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top