Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ramesh Narvekar : हौशी नाट्यवेडा रमेश नार्वेकर

Ramesh Narvekar : हौशी नाट्यवेडा रमेश नार्वेकर

- नारायण गिरप

भिनेता आणि दिग्दर्शक रमेश नार्वेकर यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे नाटकाविषयीची अफाट आवड. आंब्याचा व्यवसाय करणारा माणूस पुढे स्वत:ची सॉ मिल सांभाळत नाट्य चळवळीत सक्रिय राहिला.

कामाच्या व्यापातून वेळ काढत, कष्टानं तालीम करत प्रयोगासाठी झटणं हे त्यांच्या नाट्यवेड्या स्वभावामुळेच शक्य होतं. त्यांच्यासाठी प्रेक्षकांची दाद आणि प्रयोगाचा आनंद महत्त्वाचा असतो. राज्य नाट्य स्पर्धेला नाटक पूर्णत्वास येईपर्यंतचा सर्व आर्थिक भार ते स्वतः घेतात. कोकणातील नाट्य चळवळ जिवंत ठेवण्याचं मौलिक काम ते करत असतात.


शांत, संयमी, धडपडी वृत्ती असलेली मेहनती व्यक्ती समाजातील आणि कोणत्याही कामाच्या ठिकाणी अत्यंत मौल्यवान रत्नं असतात, असेच एक हौशी नाट्यवेडे व्यक्तिमत्त्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात आहे ते म्हणजे रमेश नार्वेकर! या हौशी नाट्य कलावंताचा जन्म 15 जानेवारी 1951 ला उभादांडा-वेंगुर्ला येथे झाला. वाणिज्य शाखेचे (बी.कॉम.) पदवीधर असलेल्या नार्वेकरांना शालेय जीवनापासूनच नाटकाची आवड होती. पुढे वेंगुर्ल्यातील कै.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात प्रा.शशिकांत यरनाळकर सरांमुळे ती अधिकच वाढत गेली. प्रा. यरनाळकर हे एक वेंगुर्ल्यातील नाट्यक्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व, ज्यांचं योगदान स्थानिक रंगभूमीसाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. वेंगुर्ले येथे 'कलावलय' संस्थेच्या वतीनं दरवर्षी स्वर्गीय प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा' आयोजित केली जाते. या स्पर्धांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कलाकार घडविले गेले आहेत. 'कोकणातील नाट्य चळवळ' जिवंत ठेवण्याचं काम या उपक्रमातून केलं जातं. या चळवळीतील उत्साही हौशी नाट्य कलावंत म्हणजेच रमेश नार्वेकर.

'हौशी नाट्य कलावंत' हे मराठी रंगभूमीचा कणा मानले जातात. व्यावसायिक अभिनयापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी आणि कलेच्या प्रेमापोटी हे कलाकार रंगभूमीवर काम करतात. नार्वेकर यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे नाटकाविषयीची अफाट आवड. आंब्याचा व्यवसाय करणारा माणूस पुढे स्वतःची सॉ मिल सांभाळत नाट्य चळवळीत सक्रिय राहिला. कामाच्या व्यापातून वेळ काढत, कष्टानं तालीम करत प्रयोगासाठी झटणं हे त्यांच्या नाट्यवेड्या स्वभावामुळेच शक्य होतं. त्यांच्यासाठी प्रेक्षकांची दाद आणि प्रयोगाचा आनंद महत्त्वाचा असतो. राज्य नाट्य स्पर्धेला नाटक पूर्णत्वास येईपर्यंतचा सर्व आर्थिक भार ते स्वतः घेतात.

'कला सहयोग' उभादांडा-वेंगुर्ले या स्वतःच्या ग्रुपतर्फे नार्वेकर यांनी 'कथा कुणाची, व्यथा कुणा' (गो.गं. पारखी),'वेगळं व्हायचंय मला' (बाळ कोल्हटकर), 'प्रेमा तुझा रंग कसा' (वसंत कानेटकर), 'दैव जाणिले कुणी', 'कथा रंगली पाषाणाची', 'अहो मला जगायचंय' आदी बरीच नाटके केली. कधी श्री देव वाटोबा मंदिरात उत्सवानिमित्त तर कधी इतर ठिकाणी एकांकिका/नाटकं केली. नार्वेकर अभिनयासह दिग्दर्शनही उत्तम प्रकारे करतात. महाविद्यालयीन जीवनात 'लेकुरे उदंड झाली', 'झोपी गेलेला जागा झाला', 'दिनूच्या सासूबाई राधाबाई' अशी कौटुंबिक जिव्हाळ्याची भावस्पर्शी नाटकं केली. भाऊ चांदेकर, नितीन नेरुरकर, विजय मोंडकर असे विद्यार्थी-कलाकार त्यावेळी या नाटकांत अभिनय करायचे.

राज्य नाट्य स्पर्धेसाठी 'काळा वजीर, पांढरा राजा' (डॉ. समीर कुलकर्णी),'खरं सांगायचं तर' (उदय नारकर), 'भोवरा' (मधुकर तोरडमल), 'कालचक्र', 'सूर्यास्त'(जयवंत दळवी), 'एका ब्लॉकची गोष्ट' (हेमंत एदलाबादकर), अशी नाटकं तर 'केस नं.39', 'होळी'(महेश एलकुंचवार), 'कळसूत्री', 'खेळ खेळियाचा', 'प्रतीक्षा' अशा एकांकिकाही त्यांनी इतर कलाकारांसह यशस्वीपणे केल्या. त्यांच्या या हौशी नाटकांसाठी लाभलेल्या उत्कृष्ट कलाकारांची वीण घट्ट असल्यामुळे तालमीदेखील रंगतदार होतात. नार्वेकरांचे मात्र तालमीतच पाठांतर चोख झालेले असतं, पूर्ण नाटकच त्यांच्या मनात रुंजी घालत असतं. त्यांचं नाव ऐकूनच प्रयोग हाऊसफुल्ल होतात. अभिनय, दिग्दर्शन, वेशभूषा, नेपथ्य-प्रकाशयोजना हे सर्वच उत्कृष्ट होण्यामागे त्यांच्या वाचनाच्या आवडीचा मोठा हात आहे.

वाचनाचेही वेड असलेल्या नार्वेकरांना वाटते की, वाचनामुळे विचारांना सकारात्मक दिशा मिळते. व्यक्तीला 'स्व'चा शोध घेण्यास मदत होते. भाषेवर प्रभुत्व नि एकाग्रता वाढते. कल्पनाशक्ती, सर्जनशीलता विकसित होते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. वाचनवेडात बाहेरच्या गोंगाटापेक्षा आतल्या संवादात जास्त गोडवा असतो.

राज्य नाट्य स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी ते महिना-दोन महिने तयारी करतात. नेपथ्य-प्रकाशयोजना या सर्व गोष्टींची जबाबदारी आपापसात मदत करून पार पाडतात. त्यांच्यातील हौशीपणाच त्यांना रंगभूमीवर टिकवून ठेवतो. नार्वेकरांसारखे हौशी नाट्य कलावंत हे मराठी रंगभूमीचे खरे आधारस्तंभ म्हटल्यास वावगे ठरू नये. आज वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांच्यात प्रचंड ऊर्जा नि कलेप्रती निष्ठा आहे. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात अनेक सकारात्मक गुण असतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवितात. हे कठीण परिस्थितीतही आपली मानसिक शांतता गमावत नाहीत. भावनेच्या भरात निर्णय न घेता विचारपूर्वक नि संयमाने आपल्या कामात पूर्णपणे समर्पित झालेले असतात.

रमेश नार्वेकर यांना अभिनय-दिग्दर्शनासाठी नाटक आणि एकांकिका स्पर्धांत मालवणी चषक, कै.भाई आजगांवकर स्मृती एकांकिका स्पर्धा, बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा, कलावलयतर्फे केलेल्या नाटक-एकांकिका स्पर्धा, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग, ॐकार सांस्कृतिक-कला-क्रीडा मंडळ, स्वयंभू कला-क्रीडा मंडळ आदी बरीच पारितोषिके मिळालेली आहेत.

हौशी मराठी रंगभूमीला प्रगल्भ आणि बहारदार ठेवण्यात नार्वेकरांसारख्या रंगकर्मींचा अनमोल वाटा आहे. एक कलाकार म्हणून हौशी रंगभूमीला समृद्ध करणं नि घडविणं हा अशा कलाकारांच्या सृजनप्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. कुठलाही कलावंत रातोरात मोठा होत नसतो, त्यासाठी त्याला तालीम करावीच लागते, यानंतर त्याच्यातील कलागुण दाखवायला रंगमंच लागतो. तो हक्काचा रंगमंच राज्य नाट्य स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा यांच्या निमित्ताने नवोदित कलाकारांना महाराष्ट्र शासन दरवर्षी देते. त्यातूनच नवोदित कलाकारांचे प्रयोगशील नाटक जगलं आहे, रमेश नार्वेकरांसारख्या हौशी नाट्यवेड्यांसह नाट्यप्रेमीही यात सहभागी होत आहेत. याच स्पर्धांतून त्यांच्या नाट्य जाणिवा समृद्ध होत असतात.

वेगवेगळ्या हौशी रंगकर्मींच्या संस्था राज्यभर पदरमोड करून नाटक-एकांकिका सादर करतात. यातूनच अनेक नवे रंगकर्मी मराठी रंगभूमीवर येतात. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेली ही स्पर्धा शासन पातळीवर 60 वर्षे जगवणं, सातत्य राखणं साधं-सोपं नक्कीच नाही. अनेकानेक अडचणींशी झगडत, वेळोवेळी बदलत, नवे नियम स्वीकारून ही स्पर्धा जगविण्यात महाराष्ट्रातल्या गावोगावच्या, रमेश नार्वेकरांसारख्या रंगकर्मींचाही मोठा वाटा आहे. ध्यासवेडापायी आपलं तन-मन-धन अर्पून उत्तम कलाकृती साकारणार्‍या या रंगकर्मीला रंगदेवतेचे आशीर्वाद कायम लाभोत हीच प्रार्थना!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar